घालुनी घाव घणाचे नशीब आजमावितो!
By Admin | Published: January 5, 2016 12:36 AM2016-01-05T00:36:42+5:302016-01-05T00:36:42+5:30
शेती अवजारांना झळाळी : परप्रांतीय कारागिरांकडून पाटण तालुक्यात शेतकऱ्यांना सेवा
राजेंद्र लोंढे ल्ल मल्हारपेठ
खेडोपाडी शेती औजारं बनविणारी बलुतेदारी पद्धत संपुष्टात आली आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे ग्रामीण कारागीर काळाच्या पडद्याआड गेला आहे. पाटण तालुक्यात त्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही कारागीर कुटुंबे या भागातील शेती अवजारांना झळाळी देऊन शेतकऱ्यांना सेवा देण्याचे काम करत आहेत.
पाटण—कराड मार्गावर निसरेफाटा येथे हीच कष्टाची कामे घेऊन आलेत मध्यप्रदेशातील कष्टकरी कुटुंबे. हे कारागीर कुऱ्हाडी, टिकाव फावडे, कुदळ सतुर, भाला, बरचा, नांगर, कुळव, पास, विळा, खुरपे अशा शेती अवजारांना झळाळी देत आहेत. त्यामुळे आपली शेती अवजारे दुरुस्त करून घेण्यासाठी गर्दी होत आहे. ही कला पाहण्यासाठीही अनेकजण येथे थांबत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या कारागीरांकडे पाहिल्यानंतर खेडोपाडी बलुतेदारीतून कारागिरी लुप्त होत असल्याचीच आठवण सतावत आहे. कुठे गेले ग्रामीण कारागीर. भाता, तप्त निखारे, ऐरणीवर घाव घालणारी साथीदारीण व लाल भडक लोखंडाला आकार देणारा कारागीर हे दृश्य निसरेफाटा येथे रस्त्याकडेला पाहायला मिळत आहे. कालबाह्य होत चाललेली ही कला आकर्षणाचे केंद्र बनत आहे. लोखंडापासून वस्तू कशा बनवतात, हे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने स्थलांतराची वेळ
महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय कारागीर पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकत आहेत. अव्वल दर्जाचे हे कारागीरही त्या प्रांतातील बलुतेदार आहेत. रामसिंग, जसवंतसिंग, धारासिंग लोहार अशी या कारागिरांची कुटुंबं आहेत.
कष्टाचे मोल कवडीमोल!
मध्यप्रदेशमध्ये आम्हा बलुतेदार कुटुंबांना जमीन व मिळकतीसाठी कोणतेच साधन नाही. यामुळे उदरनिवार्हासाठी महाराष्ट्र, कर्नाटकात शेकडो कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही. राहण्यास जागा नाही गावोगावी स्थलांतर होत आहे. यंत्रामुळे पूर्वीसारखी शेती अवजारे राहिली नाहीत. त्यामुळे कष्टातूनही काही मिळकत होईना. कोळसा टाकून भाता फुकून तापलेल्या लोखंडावर घणाचे घाव टाकूनही घामाचे दाम मिळेना, याचेच वाईट वाटते, अशी खंत रामसिंग लोहार यांनी ‘लोकमत’जवळ बोलून दाखविली.