मतदान करा अन् आवर्जून लग्नाला या; नवरदेवाचं साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:17 AM2019-04-22T05:17:10+5:302019-04-22T05:17:36+5:30
लग्नपत्रिकेवर छापली बॅलेट मशीन
उंब्रज : जीवनात लग्नसोहळा हा आनंदाचा क्षण. या सोहळ्यात वर व वधू लग्नाच्या बंधनाने एकत्र येतातच; परंतु दोन कुटुंबं, नातेवाईक, मित्रपरिवार या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येत असतो. अशा आनंदाच्याच दिवशी लोकशाहीतील महत्त्वाचे घटक असलेली मतदानाची प्रक्रिया होत असेल तर या आनंददायी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही म्हणून मतदारराजाने मतदानही करावे आणि लग्नसोहळ्यात उपस्थितही राहावे म्हणून इंदोली येथील युवकाने आपल्या लग्नपत्रिकेत मतदान मशीनचे चित्र छापून मतदान का करावे? याचे प्रबोधन केले आहे.
अमोलचा विवाह कामेरी (ता. जि. सातारा) येथील सोनाली घाडगे यांच्याबरोबर ७ मार्चला ठरला. तातडीने विवाहासाठी कार्यालय, वाजंत्री, घोडा ठरवण्यात आले. आणि १० मार्चला निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. सातारा लोकसभेची निवडणूक २३ एप्रिलला जाहीर करण्यात आली. यानंतर चव्हाण व घाडगे कुटुंबात लग्नाची तारीख बदलूया यावर चर्चा झाली. परंतु लग्न सोहळ्यासाठी अनेक गोष्टी ठरवण्यात आल्या असल्यामुळे तारीख बदलता येत नव्हती. मतदानामुळे लग्नास लोक कसे येणार, याची रुखरुखही होती. मात्र, वर अमोल याने वधू सोनाली व दोन्ही कुटुंबांतील ज्येष्ठांशी चर्चा केली आणि लग्नपत्रिकेतच मतदान करावे. याविषयी प्रबोधन करण्याचे ठरविले. यातून एक आगळी-वेगळी लग्नपत्रिका तयार झाली. हा विवाह सोहळा इंदोली फाटा येथील कार्यालयात २ वाजून ५० मिनिटांनी होणार असल्यामुळे लग्नसोहळ्यास येणाऱ्या प्रत्येकास मतदान करून सोहळयास उपस्थित राहणे शक्य आहे तसेच या सोहळ्यातील वºहाडी मंडळी मतदान करूनच लग्न ठिकाणी जाणार असल्याचेही अमोलने सांगितले.
अशी आहे लग्नपत्रिका
लग्नपत्रिकेच्या लखोट्यावर मतदान यंत्राचा फोटो छापण्यात आला आहे तर लग्नपत्रिकेत पूर्ण एका पानावर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक, आमदार, खासदार या निवडणुकीत मतदान कोणाला व का करावे? याविषयी माहिती दिलेली आहे आणि शेवटी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही प्रकियेत सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे.