Satara- वाई बाजार समिती कांद्याची विक्रमी आवक, भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 02:15 PM2023-03-31T14:15:45+5:302023-03-31T14:16:05+5:30
कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले
वाई : राज्यभरात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. उत्पादन खर्च एवढा ही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे व शेतकऱ्याकडे साठवणुकीची सुविधा नसल्यामुळे बाजारात कांदा आणल्या शिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही वाई कृषी उत्पन्न बाझार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक असून, चार दिवसांत सरासरी तीन ते साडेतीन हजार पोत्यांची आवक झाली आहे. पुरंदर, लोणंद, खंडाळा आणि वाई येथील अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा वाई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता.
वाई बाजार समितीमध्ये कांदा खरेदीसाठी बंगलुरू, आसाम, कोकण महाबळेश्वर येथून व्यापारी वर्ग येत आहेत. सर्व साधारण ५ ते ११ रुपये भाव मिळत आहे. कांद्याचे लिलाव चालू असताना अडत व्यापारी अजय मांढरे, शेतकरी भानुदास धमाल, राजू चव्हाण, दिलीप गायकवाड, अर्जुन शिर्के, किसन यादव व व्यापारी समीर हागवणे, नितीन शेलार, रोहित नेवसे, गौरव जगताप आदी उपस्थित होते.
विक्री हॉलची सोय करण्याची मागणी
कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बरसा कांदा उघड्यावर ठेवावा लागत आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास कांद्याचे नुकसान होऊ शकते. बाजार समिती प्रशासनाने विक्री हॉलची सोय करून द्यावी, अशी व्यापारी व शेतकरी वर्गाची मागणी आहे.