अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही वेटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:40 AM2021-05-06T04:40:47+5:302021-05-06T04:40:47+5:30

कोरेगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील मृत्युदर जास्त असून, कोरोनाबाधित मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी शासनाकडून करण्यात आलेली स्मशानभूमीची ...

Waiting at the cemetery for the funeral! | अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही वेटिंग!

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही वेटिंग!

Next

कोरेगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील मृत्युदर जास्त असून, कोरोनाबाधित मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी शासनाकडून करण्यात आलेली स्मशानभूमीची व्यवस्था आता अपुरी ठरू लागली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड यापाठोपाठ आता अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही वेटिंग करावे लागत असल्याने बाधितांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्हा प्रशासनाने आता तरी स्मशानभूमीची संख्या वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वजण अनभिज्ञ होते. त्यामुळे यंत्रणा कशीबशी काम करत होती. पहिल्या लाटेचा तडाखा मोठा नसल्याने अनेकजण घरीच औषधोपचार घेऊन बरे होत होते. त्यामुळे मृत्यूचा दर जास्त नव्हता. पहिल्या लाटेच्यावेळी जिल्हा प्रशासनाने दि. ८ जून २०२० रोजी जिल्हा आणि तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपालिका अथवा नगरपंचायतीच्या स्मशानभूमीमध्येच कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश काढला होता.

कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्‍वर आणि माण तालुक्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींची संख्या जास्त असल्याने तेथे प्रत्येकी दोन शहरांमध्ये अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आलेली होती. कोरेगाव तालुक्यात दक्षिण भागातील २६ गावांसाठी रहिमतपूरच्या ब्रम्हपुरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आलेली असून, उर्वरित ११६ गावांसाठी कोरेगाव शहरातील दोन स्मशानभूमींमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.

वास्तविक, कोरेगाव तालुक्याची भौगोलिक रचना जर पाहिली, तर उत्तर विभाग हा मोठा असून, त्याचे मुख्यालय हे पिंपोडे बुद्रुक आहे. ज्या भौगोलिक रचनेप्रमाणे कोरेगाव तालुक्याचे तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभाजन झाले आहे. त्याच धर्तीवर अंत्यविधीसाठी स्मशानभूमींचे विभाजन केले जावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षी जून महिन्यात काढलेल्या आदेशाची आजअखेर अंमलबजावणी सुरू आहे. कोरोनाबाधित व्यक्ती जर रुग्णालयात असेल, तर त्याच्या जवळ जाता येत नाही. मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीला जाता येत नाही. त्यामुळे अंत्यविधीनंतर हिंदू शास्त्राप्रमाणे इतर विधी करणे हे कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कोरेगाव शहरात गर्दी होत आहे. सोळशीपासून ते भाडळेपर्यंत ग्रामीण भागातील लोकांना नाहक कोरेगाव येथे जावे लागत असून, लॉकडाऊनच्या काळात वाहने उपलब्ध होणे, पोलिसांची नाकाबंदी आदी गोष्टींमुळे मृत व्यक्तीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी नवीन आदेश काढून ग्रामीण भागात स्मशानभूमींची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

चौकट..

प्रशासनाच्या आदेशामध्ये बदल करावा...

कोरेगाव तालुक्यात अनेक मोठ्या ग्रामपंचायती असून, त्यांच्या स्मशानभूमी या गावापासून दूर अंतरावर आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव न होण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशामध्ये बदल करून प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय ग्रामीण भागात स्मशानभूमीची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चौकट :

सायरनच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीती...

रुग्णवाहिका चालकांना आता तरी सूचना द्या,

ग्रामीण भागात शववाहिकांचे प्रमाण कमी असल्याने कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी नेताना अथवा कोरोनाबाधित मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी नेताना रुग्णवाहिकेचा सर्रास वापर केला जात आहे. स्मशानभूमीकडे दिवसातून कमीत कमी चार ते पाच वेळा जाताना मोठमोठ्याने सायरन वाजवत रुग्णवाहिका जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे. सध्या लॉकडाऊन असून, रस्त्यावर वर्दळ नाही, त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी सायरनवर नियंत्रण आणावे, याबाबत संबंधित प्रशासन, रुग्णालयाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Waiting at the cemetery for the funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.