सातारा शहरालगतच्या दिव्यनगरीत जायचंय.. नको रे बाबा, वाहनधारक, नागरिक मेटाकुटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 05:35 PM2017-12-13T17:35:40+5:302017-12-13T17:39:54+5:30
सातारा शाहूपुरीतून दिव्यनगरी, कोंडवेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे. या रस्त्यात पडलेल्या मोठ-मोठाल्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालकही या ठिकाणी भाडे घेऊन येण्यास धजावत नाही. स्कूलबस बंद झाल्यानेही शाळकरी विद्यार्थ्यांना दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असून, दिव्यनगरीत जायचंय.. नको रे बाबा अशी प्रतिक्रिया वाहनधारकांमधून उमटत आहे.
सातारा : शाहूपुरीतून दिव्यनगरी, कोंडवेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे. या रस्त्यात पडलेल्या मोठ-मोठाल्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालकही या ठिकाणी भाडे घेऊन येण्यास धजावत नाही. स्कूलबस बंद झाल्यानेही शाळकरी विद्यार्थ्यांना दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असून, दिव्यनगरीत जायचंय.. नको रे बाबा अशी प्रतिक्रिया वाहनधारकांमधून उमटत आहे.
गाव तेथे रस्ता हे सरकारचे धोरण असताना सातारा शहरालगतच्या भागातील चित्र मात्र वेगळेच दिसत आहे़ शाहूपुरी चौक ते दिव्यनगरीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, हा रस्ता केवळ कागदोपत्री शिल्लक राहिला आहे की काय, असा भास होऊ लागला आहे.
शाहूपुरीपासून सुमारे दोन किलोमीटरच्या या रस्त्यावरील खडी पूर्णपणे उखडून गेल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहने चालविताना सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. साताऱ्याहून मेढ्याकडे जाणारा हा पर्यायी मार्ग असल्याने या मार्गावरून पूर्वी सतत वाहतूक सुरू होती. मात्र, रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने या मार्गावरील वाहतूकही आता पूर्णपणे बंद झाली आहे.
दिव्यनगरीतून अनेक विद्यार्थी शाळेसाठी शाहूपुरी अथवा साताऱ्याला येतात. या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूलबसही आता बंद झाल्याने विद्यार्थ्यांना दररोज सुमारे दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या कार्यकक्षेत येणारा हा भाग असून, विविध राजकीय पक्षांकडून तीन वेळा या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले़ परंतु अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थी तसेच वाहनधारकांची अडचणीतून सुटका करावी, अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे.