चेतक होता की कृष्णा? हे तर तुम्हालाच ठाऊक: शिवेंद्रसिंहराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:00 AM2018-09-19T00:00:09+5:302018-09-19T00:00:16+5:30
सातारा : ‘मंगळवार तळ्यातील विसर्जनास बंदी करण्याची पत्रे तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी प्रशासनाला दिली. ते पत्र घ्यायला चेतक आला होता का कृष्णा? हे तुम्हालाच माहिती. पत्रावर सही करताना झोपेत होता का तंद्रीत होता? का तुमचा मोत्या सही घेताना तुम्ही भिंतीला धरून उभा होता?’ असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केला.
खासदार उदयनराजे यांनी दिलेल्या उत्तरला प्रत्युत्तर देताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, या अट्टाहासापोटी खासदारांनी साताऱ्यातील गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्न चिघळवला. काहीही झाले तरी मंगळवार तळ्यात विसर्जन करणारंच, अशी आडमुठी आणि अडेलतट्टू भूमिका घेणारे खासदार आता माझ्यामुळेच प्रशासनाने कृत्रिम तळे खोदल्याचे सांगत आहेत. मंगळवार तळे का कृत्रिम तळे? नेमकी तुमची भूमिका काय होती, हे एकदा स्पष्ट करा.’
२०१५ मध्ये पाणीटंचाई होती, असे सांगून तुम्ही सातारकरांना भुलवू नका. अगदी ६० वर्षांत कधीही मंगळवार तळे आणि मोती तळ्यातील पाणी कोणीही पिण्यासाठी वापरलेले नाही. त्यामुळे टंचाईचा आणि या तळ्यांचा संबंधच नाही. टंचाईचे नियोजन करण्यासाठी विसर्जनास बंदी आणल्याचे धादांत खोटे सांगणारे खासदार सातारकरांना तळ्यातील घाण पाणी पाजणार होते काय? विसर्जनाचा प्रश्न निर्माण करून नागरिकांना, गणेश मंडळांना आणि जिल्हा प्रशासनाला वेठीस धरून तुम्ही काय मिळवले? केवळ थापेबाजी आणि डायलॉगबाजी करून प्रश्न सुटत नसतात, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
सातारा पालिकेनेच तुम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नसून पालिकेने मंगळवार तळ्यात विसर्जनास बंदी केली असल्याने तुमचे नाकच कापले गेले. त्यामुळे तुमचा तीळपापड होत असून, तुमचे मानसिक संतुलन ढळत चालले आहे. ज्या पालिकेत एकहाती सत्ता आहे,
त्याच पालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पाळण्याचा निर्णय घेतला असून, त्या आदेशाप्रमाणे मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास पालिकेनेही बंदी केली आहे. आमच्या संस्थांबद्दलचे तुणतुणे वाजवणे बंद करा. तोंड दाखवायला जागा नसल्याने तुम्ही मुद्द्याला बगल दिली, हे पळपुटे
धोरण सातारकरांना कळून चुकले आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
मला दाढी आहे म्हणून येते
माझी दाढी आणि विसर्जन याचा काही संबंध आहे का? पण विषयाला बगल देण्यासाठी तुम्ही दाढीकडे गेलात. माझ्या दाढीची काळजी तुम्ही करू नका. मला दाढी आहे म्हणून दाढी येते. तुम्हाला उगवती का नाही आणि उगवली तर, राहील का नाही, अशी चिंताजनक अवस्था तुमची आहे. तुमच्या लहरीपणामुळे विसर्जनाची काय परिस्थिती झाली? ज्या मंगळवार तळ्यात विसर्जन होत होते ते तुम्ही मायलेकराने बंद पाडले आणि आता त्याच तळ्यात विसर्जन करण्याचा अट्टाहास करून हम करे सो कायदा, करण्याचा प्रयत्न तुम्ही केला, अशी टीकाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.