पाच जिल्ह्यांच्या रहदारीवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:34 AM2021-04-26T04:34:51+5:302021-04-26T04:34:51+5:30
कऱ्हाड : सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून महामार्ग तसेच राज्यमार्गांवरून कऱ्हाड तालुक्यात प्रवेश करता येतो. मात्र, ...
कऱ्हाड : सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून महामार्ग तसेच राज्यमार्गांवरून कऱ्हाड तालुक्यात प्रवेश करता येतो. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांनी जिल्ह्याच्या हद्दी ‘लॉक’ केल्या आहेत. त्यामुळे परजिल्ह्यातून कऱ्हाड तालुक्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच येत नाही.
दरम्यान, छुप्या पद्धतीने गावाची वाट धरणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. परजिल्ह्यातून एखादा गावी आल्यास त्याच्यावर थेट कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून छुप्या पद्धतीने येणारे आता कायद्याच्या कचाट्यात सापडत आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी संचारबंदी करण्यात आली. मात्र, ती कोणीही गांभीर्याने घेतली नाही. बाजारपेठेसह रस्त्यावर गर्दी जैसे थे होती. अखेर ‘लॉकडाऊन’चा पर्याय निवडण्यात आला. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली. कऱ्हाड हे सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. कऱ्हाडच्या पश्चिमेला रत्नागिरी, दक्षिणेला कोल्हापूर, पूर्वेस सांगली जिल्हा आहे. पाटण तालुक्यातील घाटमाथ्यापासून रत्नागिरी, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील मालखेडपासून सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका, त्यापुढे कोल्हापूर जिल्हा, कऱ्हाड-तासगाव राज्यमार्गावर शेणोलीपासून वाळवा तालुका, विजापूर महामार्गावर सुर्लीपासून पुढे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका, तर त्यापुढे सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. सध्या हे सर्व रस्ते पोलिसांनी रोखले असून छुप्या प्रवासी वाहतुकीवरही ‘वॉच’ ठेवला आहे.
- चौकट
तपासणी नाक्यावर वैद्यकीय पथक तैनात
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मालखेड येथे पोलिसांनी महामार्ग रोखला आहे. त्याठिकाणी वैद्यकीय पथकही तैनात असून एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही हे पथक करते. तसेच काहीजण आजारी असल्याचे खोटे कारण सांगतात. त्यांचा खोटेपणाही येथे उघडकीस येतो.
- चौकट
लॉकडाऊन व जिल्हाबंदी आदेश असतानाही कोणी छुप्या पद्धतीने परजिल्ह्यातून गावी येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. गर्दी होणारा कोणताही कार्यक्रम आयोजित केल्यास आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाईल. यात्रा भरवली किंवा पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊन यात्रेचा धार्मिक कार्यक्रम केला तर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.
- बाळासाहेब भरणे
पोलीस निरीक्षक, कऱ्हाड ग्रामीण
- चौकट
पाच तपासणी नाके
१) तासगाव मार्गावर शेणोली स्टेशन
२) राष्ट्रीय महामार्गावर मालखेड फाटा
३) चांदोली मार्गावर येळगाव फाटा
४) विटा मार्गावर सुर्ली घाट
५) सोनसळ मार्गावर सोनसळ घाट
फोटो : २५केआरडी०१
कॅप्शन :
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मालखेड फाटा येथे कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी तपासणी नाका उभारला आहे.