नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सिंचनासाठी ९.९६ टीएमसी क्षमतेच्या बांधण्यात आलेल्या उरमोडी धरणात २०१० पासून पूर्णपणे पाणीसाठा होत असलातरी अद्यापही वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे २७ हजार ७५० पैकी फक्त ८ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाचा फायदा होत आहे. सिंचन व्यवस्थेची कामे वेळेत झाली असती तर आतापर्यंत उर्वरित १८ हजारांवर हेक्टर क्षेत्रही पाण्याखाली आले असते. आता ही सर्व कामे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.परळीजवळ कृष्णेच्या उरमोडी या उपनदीवर माती धरण बांधण्यात आले आहे. ९.९६ टीएमसी क्षमतेचे हे उरमोडी धरण असून, याला १९९३ मध्ये प्रशासकीय मान्यात मिळाली. त्यानुसार २१२ कोटी ७ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यानंतर प्रथम आणि द्वितीय सुधारित मान्यता मिळत प्रकल्प १४०० कोटींवर गेला. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसाठी हे धरण तारणहारच ठरणारे आहे. कारण या दोन तालुक्यांतील प्रत्येकी ९ हजार ७२५ हेक्टर तर सातारा तालुक्यातील ८ हजार ३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी ८.९० टीएमसी पाणी वापर होणार आहे. तर त्यातील २.३८ टीएमसी पाण्याचा वापर सातारा तालुक्यासाठी होईल. तसेच माण आणि खटाव तालुक्याच्या वाट्याला प्रत्येकी ३.२६ टीएमसी पाणी येते. मात्र, सध्या वितरण व्यवस्थेची कामे तिन्ही तालुक्यांत पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे सातारा तालुक्यातील ८ हजार ३०० पैकी १९०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. तर खटावमधील ६ हजार ७८५ आणि सर्वात कमी माण तालुक्यातील १७९ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्याची सोय झालीय.कण्हेर जोड कालवा असून, त्याचे काम पूर्ण झाले आहे. ७ ते ८ किलोमीटरमधील अस्तरीकरणाचे काम बाकी आहे. सातारा डावा कालवा ऐकून १५ किलोमीटरचा आहे. त्यातील १० किलोमीटर लांबीमधील माती आणि बांधाकम पूर्ण झालंय. उर्वरित काम बंदिस्त पाईपलाईनचे आहे. उरमोडी उजव्या कालव्याचे १ ते ३५ मधील अंदाजे १० किलोमीटर लांबीतील मुख्य कालव्याची अंशत: कामे पूर्ण झालीत. उर्वरित मुख्य कालवा आणि वितरण व्यवस्थेची कामे बंदिस्त पाईपलाईनद्वारे होणार आहेत. तर खटाव कालवा १ ते ७६ किलोमीटर राहणार आहे. त्यातील माती व बांधकामे पूर्ण झालीत. या कालव्यांतर्गत वितरण प्रणालीची कामे अजूनही प्रगतिपथावर आहेत.माण तालुक्यातच्या कालव्याची १ ते २४ किलोमीटरमधील कामे पूर्ण आहेत. मात्र, २५ ते ३१ किलोमीटरमधील कामे अजूनही प्रगतिपथावर असून, डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच उरमोडी उपसा सिंचन योजनेच्या वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथील १२ पैकी ८ पंपांची उभारणी पूर्ण झालीय. तर टप्पा क्रमांक २ कोंबडवाडीतील सर्व ९ पंपांचीही उभारणी पूर्ण झाली आहे.धरण पूर्ण झाले असलेतरी वितरण व्यवस्थेची कामे आतापर्यंत लटकली आहेत. धरणात पाणी असूनही सिंचनासाठी पूर्णपणे त्याचा वापर होताना दिसून येत नाही. २०२२ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सिंचनासाठी पूर्ण पाणी वापरासाठी तीन वर्षांचा कालावधी जाणार हे निश्चित आहे.२३ गावे बाधित...उरमोडी धरणामुळे सातारा तालुक्यातील २३ गावे बाधित झाली आहेत. त्यातील ११ गावे पूर्ण तर उर्वरित १२ ही अंशत: बाधित झालीत. धरणामुळे बाधित लोकसंख्या ५ हजार ८७३ झाली असून, एकूण बुडीत क्षेत्र १७० हेक्टर आहे.पाणलोट क्षेत्र ११६ चौरस किलोमीटरउरमोडी नदीवर धरण असून, पाणलोट क्षेत्र ११६.८६ चौरस किलोमीटर आहे. धरणाची लांबी १८०३ तर उंची ५०.१० मीटर आहे. धरणाला चार वक्र दरवाजे असून, ते १२ बाय ८ मीटर आकाराचे आहेत.
धरणातील पाणी गेले माणला; पण नाही मिळाले साताऱ्याला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:18 AM