भर उन्हाळ्यात गणेशखिंडीत पाण्याचे पाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:00+5:302021-05-05T05:04:00+5:30
पेट्री : सातारा शहराला कास व शहापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. कास तलावातील पाणीपातळी खालावत असतानाच गणेशखिंड परिसरातील कासच्या ...
पेट्री
: सातारा शहराला कास व शहापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. कास तलावातील पाणीपातळी खालावत असतानाच गणेशखिंड परिसरातील कासच्या एअर व्हॉल्व्हच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. भर उन्हाळ्यात वाहून जात असलेल्या पाण्याचे पाट थांबविण्यासाठी दुरुस्ती करून गळती थांबविण्याची मागणी केली जात आहे.
कास तलावामधून सातारा शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होत असतो. सद्य:स्थितीला उन्हाची तीव्रता तसेच शहराला दररोज होत असलेल्या एक ते दीड इंचापर्यंतचा पाणीपुरवठा यामुळे कास तलावातील शिल्लक पाणीसाठा नऊ फुटाच्या खाली आला आहे. आत्तापर्यंत झालेल्या वळीव पावसाने तलावाच्या पाणीपातळीत कसलीच वाढ झालेली नसून केवळ जमिनीची धर धरण्यास मदत झाली आहे. यामुळे मान्सूनला सुरुवात होईपर्यंत पुरेसा पाणीसाठा शिल्लक असणे महत्त्वाचे आहे. मागीलवर्षी परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कमी कमी होत गेला. तसेच दिवसा उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने गतवर्षीपेक्षा यंदा एक फुटाने पाणीसाठा कमी शिल्लक आहे. खालावलेली पाणीपातळी पाहता गतवर्षीपेक्षा यंदा दहा ते बारा दिवस अगोदर दुसरा व्हॉल्व्ह बंद करून तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहून पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे वारंवार आवाहन केले जात आहे. दुसरीकडे सातारा-कास रस्त्यावरील गणेशखिंड परिसरातील कासच्या एका एअर व्हॉल्व्हच्या ठिकाणी कित्येक दिवसांपासून गळती लागली आहे. आत्तापर्यंत लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
सातारा-कास मार्गावरील गणेशखिंड परिसर ठिकाणी कासच्या व्हॉल्व्हला गळती लागून वाया जाणारे पाणी मोठ्या प्रमाणावर साठून रस्त्यानजीकच्या चरीतून वाहत असल्याने लवकरात लवकर या व्हॉल्व्हची गळती थांबवून पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी होत आहे.
कोट
उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असून कडक उन्हाळा जाणवत आहे. यामुळे पश्चिमेकडील काही भागांत बहुतांशी ठिकाणी पाणीटंचाईचे चित्र आहे. मात्र, गणेशखिंड परिसरातील गेल्या कित्येक दिवसांपासून कासच्या एका व्हॉल्व्हला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने गळती थांबवण्यासाठी दुरुस्ती करण्यात यावी.
- बाळासाहेब काळे,
नागरिक, सातारा.
०४कास वॉटर
सातारा-कास मार्गावर गणेशखिंड परिसरात कासच्या एअर व्हॉल्व्हला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. (छाया : सागर चव्हाण)