औंध : दरवर्षीप्रमाणे शिवसंकल्प प्रतिष्ठानने वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पक्षी व प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मूळपीठ डोंगर परिसरामध्ये केली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, उन्हाळ्यात औंध डोंगर परिसरात पशुपक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, यंदाचे हे पाचवे वर्ष आहे.
शिवसंकल्प प्रतिष्ठान, औंध यांच्यावतीने पशुपक्ष्यांसाठी श्रीयमाई डोंगर परिसरामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली. नेहमी कोणत्याही सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या या प्रतिष्ठानने पक्ष्यांसाठी डोंगर परिसरामध्ये सुमारे ११ कॅन वेगवेगळ्या झाडांना टांगून ठेवले आहेत. प्रत्येक कॅनमध्ये दीड ते दोन लीटर पाणी बसेल अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एक मोठा खड्डा खणून त्यामध्ये प्लास्टिकचा कागद टाकून पाण्याचे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. यात अंदाजे १५० ते २०० लीटर पाणी बसणार आहे. असे पाच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. एक दिवसाआड पाणी भरण्याचे नियोजन प्रतिष्ठानमार्फत करण्यात येणार असून, पावसाळा सुरू होईपर्यंत याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक कॅनमध्ये एक दिवसाआड आणि तळ्यामध्ये चार दिवसाआड पाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
कोट...
गेली पाच वर्षे आम्ही सर्व सभासद मिळून हा उपक्रम राबवित आहोत. याचप्रमाणे वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनावरही आमचा भर आहे. औंधच्या निसर्ग सौंदर्यात आणखी भर पडावी, असा आमचा प्रयत्न आहे. परिसरातील पशुपक्षी पाण्यासाठी वणवण करत आमचा परिसर सोडून जाऊ नये, यासाठी आमचा एक छोटासा प्रयोग आहे.
- नीलेश खैरमोडे, अध्यक्ष शिवसंकल्प प्रतिष्ठान
०२औंध वाॅटर
फोटो:-शिवसंकल्प प्रतिष्ठानकडून मूळपीठ डोंगरावर पशुपक्ष्यांच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये पाच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. (छाया : रशीद शेख)