खंडाळा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. याचा परिणाम होऊन महामार्गावरील वाहतूक मंदावली. कोरोनाच्या भीतीने आता महामार्गही ओस पडल्याचे चित्र दिसून आले. कारण, ज्या ठिकाणी तासात हजारोंच्या संख्येने वाहने जातात तेथे शंभरच्या घरात वाहने जात होती.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शिक्षण संस्था बंद ठेवण्यासह अनेक निर्बंध घातले आहेत. वीकेंड लॉकडाऊन लागू केला असल्याने सुट्या असतानाही लोकांनी घराबाहेर न पडता निर्बंध पाळले. त्यामुळे एरव्ही वाहनांनी गजबजलेला महामार्ग ओस पडला होता. विशेषत: नेहमी वर्दळ असणाऱ्या छोट्या कार क्वचितच दिसत होत्या. ट्रक, कंटेनर आणि जड वाहतूक करणारी वाहनेच महामार्गावर दिसून येत होती. वास्तविक, महामार्गावर तासाला हजारो वाहने जाताना दिसतात. मात्र, लॉकडाऊनमुळे ही संख्या घटल्याचे दिसून आले.
विशेषत: लोकांनी पुण्याकडे जाणे टाळले आहे. तर पुण्याकडील चाकरमानी काही प्रमाणात गावाकडे परतताना दिसून येत आहेत. पुण्यात वाढणाऱ्या या रोगाच्या भीतीने पुण्याला जाण्याचे प्रमाण घटले आहे.
खंडाळा शहरातही कडक निर्बंधांचे पालन करण्यात आले. पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या पथकाने शहरात कडक बंदोबस्त लावून लोकांवर नजर ठेवली. बाजारपेठेत सर्व दुकाने बंद असल्याने शुकशुकाट जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या सूचनांचे लोकांनी पालन सुरू केले आहे. लोकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
.....................................
फोटो आहे.