पेट्री : कास पठारच्या कुशीत घनदाट वनराईत स्वयंभू लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीघाटाई देवीचे मंदिर आहे. मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. मंदिर परिसरात ओल्या पाट्र्या झडत असल्याने तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येऊ लागले आहे. परिसरात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच तसेच चुली पेटल्याचे चित्र दिसत असल्याने भाविकांसह स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.परळी खोऱ्यातील डोंगरमाथ्यावर निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनराईत श्री घाटाई देवीचे मंदिर आहे. दरवर्षी यात्रेला लाखो भाविकांसह इतर दिवशीही अनेक भाविक दर्शनासाठी तसेच पर्यटकही या ठिकाणी भेट देतात. या देवीचा महिमा सर्वदूर पोहोचला आहे. भक्तांच्या देणगीतून देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून देवीच्या मंदिराचा जीर्णोध्दार झाला आहे. अन्य सुशोभिकरणाचे काम सुरू आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून याठिकाणी भक्तनिवास मंजूर झाले आहे. घाटाई रस्त्याचेही डांबरीकरण पूर्ण झाले आहे.
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. मंदिराला तीर्थक्षेत्रस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. देवीच्या नावे पूर्वीपासून शेकडो एकर जमीन आहे. हा परिसर निसर्गसंपदेने नटला आहे. मोठमोठ्या झाडांनी संपूर्ण परिसर वेढला आहे. पशु-पक्ष्यांचाही वावर मोठ्या प्रमाणात आहे.एखाद्या देखाव्यातील सुशोभिकरणापेक्षाही हा मंदिर परिसर सजला आहे. मात्र एकीकडे तीर्थस्थळाचा विकास होत असताना दुसरीकडे मंदिर परिसरातील देवीच्या वनराईत चुली पेटवून ओल्या पाट्र्याना ऊत आला आहे. सुटीच्या दिवशी काही हुल्लडबाज या तीर्थस्थळाच्या ठिकाणी ओपन बार भरवत असल्याचे चित्र दिसत आहे.अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच, पेटवलेल्या चुली, प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या तीर्थस्थळाचे महत्त्व व अनमोल निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलून बेशिस्त व विघातक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविक, स्थानिकांतून होत आहे.