‘व्हॉटसअॅप’ कशाला? चला भेटायला!
By admin | Published: October 9, 2014 09:33 PM2014-10-09T21:33:59+5:302014-10-09T23:01:38+5:30
उन्हा-तान्हात प्रचार : उमेदवारांबरोबरच कुटुंबीयही आले ‘एसी’तून बाहेर
प्रमोद सुकरे - कऱ्हाड -फेसबुक, व्हॉटसअॅपच्या माध्यमातून क्षणार्धात घराघरात पोहोचता येत असलं तरी निवडणुकीत हे सगळे फंडे वापरून शिवाय प्रचारासाठी उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबीयांची धावपळ होतेय़ प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जातोय़
पूर्वी वरिष्ठ नेत्यांच्या सभा ऐकायला लोक मैलोनमैल चालत यायचे़ नेतेही मोटारीतून यायचे. मध्यंतरीच्या काळात यात थोडे बदल होऊन विमान, हेलिकॉप्टरमधून येणाऱ्या नेत्यांच्या दिवसात चार-पाच सभा होऊ लागल्या़ प्रवासाची साधनं सुलभ झाल्याने माणसंही मोठ्या संख्येने येऊ लागली़
अलीकडच्या पाच-दहा वर्षात माध्यमे प्रचंड प्रभावी झाली आणि इंटरनेटच्या माध्यमातूनही घटना लगेच देश-विदेशात पोहोचू लागली़ सोशल मीडिया आला आणि एका मिनिटात घराघरात पोहोचता येऊ लागले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभाव दिसून आल्याने विधानसभा निवडणुकीतही सर्वच पक्षांनी या माध्यमांचा वापर करण्यावर भर दिलाय़ मोबाईलवर उमेदवारांच्या प्रचाराच्या ‘पोस्ट’ धडाधड पडत असून, त्या ‘डिलीट’ करताना मतदार वैतागून जातोय की काय,
अशी परिस्थिती निर्माण झाली
आहे.
प्रचाराची ही सर्व साधने उपलब्ध असताना आणि त्यांचा वापर जोरात सुरू असतानाही उमेदवारांना विजयाची खात्री दिसत नाही़ त्यामुळे उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी अक्षरश: पायात भिंगरी लावल्याचे दिसत आहे. एरवी एसी केबिनमध्ये बसणारे, एसी गाडीतून फिरणारे उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उन्हातान्हात फिरताना घामेघूम होत आहेत. अनेकांचे वजन त्यामुळे कमी झालंय म्हणे! सोशल मीडिया कितीही प्रभावी ठरत असला, तरी थेट प्रचाराला पर्याय नाही, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे.
महिलाही सक्रिय
अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिला सार्वजनिक कामात अपवाद वगळता थोड्याच प्रमाणात दिसतात़ पण यंदाची निवडणूक इतिहासातील एक महत्त्वाची निवडणूक असल्याने उमेदवारांच्या अर्धांगिनी, मातोश्री, बहिणी, स्नुषा प्रचारात सक्रिय दिसताहेत़
‘आॅक्टोबर हिट’वर
‘इलेक्शन हिट’ची मात
एरव्ही आॅक्टोबर महिन्यातील ऊन आरोग्यासाठी हानिकारक असते़ त्यापासून बचावण्याची काळजी घेतली जाते. पण याच महिन्यात आलेल्या निवडणुकांमुळे उमेदवार, कार्यकर्ते त्यावर मात करीत प्रचारात सक्रिय दिसत आहेत़