पोलीस जेवायला गेले की ‘वन-वे’ नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:14 AM2021-02-21T05:14:19+5:302021-02-21T05:14:19+5:30
सातारा : शहरात सध्या काही ठिकाणीच वन-वे सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून संभ्रमावस्था आहे. विशेषत: पाचशे एक पाटी ते मोती ...
सातारा : शहरात सध्या काही ठिकाणीच वन-वे सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून संभ्रमावस्था आहे. विशेषत: पाचशे एक पाटी ते मोती चौकापर्यंत असलेल्या वन-वेमध्ये विरुद्ध दिशेने वाहने येत असल्याचे पाहायला मिळाले.
शहरात तसं पाहिलं तर रहदारीचे मुख्य दोन रस्ते आहेत. एक राजपथ तर दुसरा रस्ता पोलीस मुख्यालयाचा. या दोन्ही रस्त्यांवर काही दिवस वन-वे करण्यात आला होता. मात्र, पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाल्यानंतर वन-वे तात्पुरता मागे घेण्यात आला. परंतु, पाचशे एक पाटीजवळ मात्र, वन-वे कायम ठेवण्यात आला. कारण, हा रस्ता मुख्य बाजारपेठेचा असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला. सकाळी दहा ते दुपारी अडीचपर्यंत वाहतूक पोलीस त्या ठिकाणी कार्यरत असतात. परंतु, पोलीस जेवायला गेल्यानंतर अनेक वाहनचालक शाॅर्टकट मारून वन-वेचा नियम तोडत असल्याचे दिसून आले. तसेच सकाळी अकराच्या सुमारासही अनेक जण वन-वेच्या नियमाचे उल्लंघन करत असतात. नियम तोडू नका, असे अनेकदा पोलीस सांगतात. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत वाहनचालक मग दंड भरत आहेत.
चाैकट : संधी मिळताच नियमाचे उल्लंघन
पाचशे एक पाटी येथे सकाळपासून दुपारी अडीचपर्यंत पोलीस ड्यूटी करत असतात. मात्र, जेवणाची वेळ झाल्यानंतर पोलीस तेथून निघून जातात. हीच वेळ साधून मग वाहनचालक वन-वेचे उल्लंघन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस असताना मात्र, क्वचितच नियमाचे उल्लंघन होत असते.
चाैकट : रस्त्यांवरच होते पार्किंग..
मोती चाैक ते पाचशे एक पाटीपर्यंत अरुंद रस्ता आहे. त्यातच व्यावसायिकांची दुकाने आणि वाहनांचे पार्किंग. त्यामुळे रस्ता अधिकच अरुंद होत गेला. या रस्त्यावरून खरं तर चालत जावं लागतं. मोठ्या वाहनांना तर तेथून ये-जा करणे शक्य होत नाही.
चाैकट : वन-वेवर गत वर्षात ४० हजार दंड वसूल
शहरात गत वर्षी काही महिने वन-वे लागू करण्यात आला होता. या काळात पोलिसांनी ४० हजार रुपये दंड वसूल केला. त्यानंतर पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाल्यानंतर वन-वे मागे घेण्यात आला. मात्र, पाचशे एक पाटीजवळ वन-वे कायम ठेवण्यात आला.
चाैकट : वाहतूक नियमांना खो
अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे पाहायला मिळाले. ट्रीपलसीट तर काही जण विनाहेल्मेट दुचाकी चालवत होते. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकात कारवाई करण्यात येत होती. परंतु, शहरात ही कारवाई झाली नाही.
कोट : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाया करण्यात येत आहेत. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे.
विठ्ठल शेलार-सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा