गोरे बंधूत ‘सहकार संघर्ष’ टोकाला !

By Admin | Published: March 18, 2015 09:35 PM2015-03-18T21:35:46+5:302015-03-19T00:00:51+5:30

सोसायट्यांच्या ठरावासाठी स्पर्धा : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी

White Brothers 'Cooperative Conflict' Tucka! | गोरे बंधूत ‘सहकार संघर्ष’ टोकाला !

गोरे बंधूत ‘सहकार संघर्ष’ टोकाला !

googlenewsNext

म्हसवड : माण तालुक्यात सोसायट्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे. आता माण तालुक्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व कोण मिळविणार, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. सध्या आमदार जयकुमार गोरे व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे या बंधूभोवती तालुक्याचे राजकारण फिरताना दिसत आहे. माणच्या सहकार क्षेत्रावर माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचे वर्चस्व होते. पण २००७ नंतर त्यांच्या या करिष्म्याला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. त्यावेळी जयकुमार गोरे यांच्या रूपाने त्यांना विरोधक झाला. मागील पाच वर्षांत पोळ यांची ताकद आणखी कमी झाल्याचे जाणवले. त्यामुळे आमदार गोरे तालुक्याचे राजकारण पाहू लागले. असे असतानाच आता त्यांच्याविरोधात पोळ नाही तर त्यांचेच बंधू व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी आव्हान उभे केले आहे. शेखर गोरेंचे आव्हान सहजासहजी मोडून काढणे आमदार गोरेंना शक्यच नाही. त्यातच राष्ट्रवादीची ताकदही शेखर गोरेंच्या पाठीशी आहे. त्यामुळे माण तालुक्यातील सहकार व राजकीय क्षेत्रावर वर्चस्व ठेवण्यासाठी दोघां बंधूतच संघर्ष होताना पाहावयास मिळणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा बँक निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. कधी नव्हे इतका सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त सोसायटी आपल्या विचाराच्या व्हाव्यात, यासाठी आमदार गोरे व शेखर गोरे यांच्यात स्पर्धा आहे. पोळ हेही वर्चस्वासाठी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)

भावांतच राहणार ठस्सल...
तालुक्यात ७६ सोसायट्या आहेत. त्यापैकी ३० सोसायट्यांची निवडणूक लागली आहे. उर्वरित ४६ सोसायट्या कोणाच्या विचारांच्या आहेत, यावर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार ते ठरणार आहे. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व माजी अर्थ व शिक्षण समिती सभापती अ‍ॅड. भास्करराव गुंडगे कोणाला साथ देणार, याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकमात्र, सोसायटी निवडणुकीत गोरे बंधू एकास एक ठस्सल देत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर गुन्हे दाखल झाल्याचीही वेळ आली होती.

सोसायटी निवडणुकीसाठी संघर्षपूर्ण वातावरण आहे. यावेळी जिल्हा बँक निवडणुकीसाठी उतरण्याची तयारी केली आहे. पण, यावेळी अधिक संघर्ष असल्याचे दिसत आहे.
- सदाशिवराव पोळ, माजी आमदार

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मागील पंचवार्षिक निवडणूक माण तालुक्यात संघर्षपूर्ण झाली होती. त्यावेळी माणचे सर्वेसर्वा समजले जाणारे माजी आमदार सदाशिवराव पोळ यांना जयकुमार गोरे यांनी सोसायटी मतदारसंघातून जोरदार लढत दिली होती. त्यावेळी तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले होते. त्यानंतर गोरे यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक लढविली आणि पोळ यांचा पराभव केला.

Web Title: White Brothers 'Cooperative Conflict' Tucka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.