कऱ्हाड : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा केल्या जात आहेत. उदयनराजेंचा पक्षप्रवेश ही काळी दगडावरची पांढरी रेष असून, त्यांचा उद्या (शनिवारी) दिल्ली येथे पक्षप्रवेश होणार आहे. कऱ्हाड -दक्षिणोत्तरमधीलही पक्षप्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आमच्याकडे आहे. वेळ आल्यानंतर ती जाहीर करू, असे पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, रविवार, दि. १५ रोजी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही सातारा जिल्ह्यात येणार असून, ती एक कुंभमेळ्याप्रमाणे दिसेल, अशी माहिती त्यांनी कऱ्हाड पत्रकार परिषदेत दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी सातारा जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कविता कचरे, अॅड. दीपक थोरात आदी उपस्थित होते.डॉ. भोसले म्हणाले, आता नेत्यांनाही कळू लागलं आहे की भाजपा हा कसा पक्ष आहे, त्यामुळे आतापर्यंत अनेकांकडून पक्षात प्रवेश केला जात आहे. अजूनही पक्षप्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आमच्याकडे आहे.विक्रम पावसकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही रविवारी सातारा जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यात आल्यानंतर वाईत त्यांची स्वागत सभा होईल, पुढे सातारा येथे महासभा त्यानंतर कऱ्हाडकडे ही यात्रा प्रस्थान करेल.
या ठिकाणी कृष्णा कॅनॉल येथे या यात्रेचे कऱ्हाड उत्तर-दक्षिणच्यावतीने स्वागत केले जाईल. तसेच छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पार पडेल. या सभेस पश्चिम महाराष्ट्रातून साधारणत: तीस हजार लोक उपस्थित राहतील, असा विश्वास पावसकर यांनी यावेळी व्यक्त केला.