का हो दुरावा.. का हा अबोला..?: उमेदवार एकत्र; पण एकमेकांकडे पाहिलेही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 10:59 PM2019-10-09T22:59:47+5:302019-10-09T23:01:06+5:30
सकाळी-सकाळी ही मंडळी क-हाडातील मुख्य चौकात दिसताहेत म्हटल्यावर ये-जा करणा-या क-हाडकरांचे त्यामुळे कुतूहल वाढले होते. काही वेळांनी पृथ्वीराव चव्हाण संयोजकांचा निरोप घेऊ लागले. तेव्हा संयोजकांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली अन् ते थांबले देखील.
प्रमोद सुकरे ।
क-हाड : विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराचे नारळ फोडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच परस्पर विरोधी उमेदवारांना एकत्रित बोलविलं तर येतील का? पण कºहाडात प्रमुख तीन प्रतिस्पर्धी एकाच कार्यक्रमात एकत्रित आले खरे; पण त्यांच्यातला दुरावा, अबोला उपस्थितांना स्पष्टपणे जाणवला. एकमेकांशी बोलणे तर दूरच त्यांनी साधे एकमेकांकडे पाहणेही टाळले.
येथील शिवप्रतिष्ठान शाखेच्यावतीने दुर्गामाता उत्सवाच्या निमित्ताने गेली अनेक वर्षे दुर्गादौडचे शहरात आयोजन केले जाते. त्याची सांगता दसºयाला उत्साहात होत असते. यंदाही या दुर्गादौडच्या सांगता समारंभासाठी संयोजकांनी दक्षिणेत निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रमुख तीन प्रतिस्पर्ध्यांना मंगळवारी सकाळी सात वाजता दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर होणा-या कार्यक्रमाला निमंत्रित केले होते. कोण येणार अन् कोण टाळणार, याबाबत संयोजकही संभ्रमात होते.
सकाळी पावणेसातच्या सुमारास रयत संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेले अॅड. उदयसिंह पाटील तेथे दाखल झाले. त्यानंतर काही वेळात पृथ्वीराज चव्हाण आले. तर काही कालावधीनंतर डॉ. अतुल भोसलेही आले. सकाळी-सकाळी ही मंडळी क-हाडातील मुख्य चौकात दिसताहेत म्हटल्यावर ये-जा करणा-या क-हाडकरांचे त्यामुळे कुतूहल वाढले होते. काही वेळांनी पृथ्वीराव चव्हाण संयोजकांचा निरोप घेऊ लागले. तेव्हा संयोजकांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली अन् ते थांबले देखील.
नाही-नाही म्हणणा-या पृथ्वीराज चव्हाणांनी डोक्यावर भगवा फेटाही बांधून घेतला. डॉ. अतुल भोसलेंनाही फेटा बांधण्यात आला. अॅड. उदयसिंह पाटील यांनी मात्र गांधी टोपीतच राहणे पसंद केले. या तिघांसह मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन होऊन दुर्गादौडच्या सांगता मिरवणुकीला प्रारंभ झाला. ध्वज फडकविताना सर्वजण जवळच उभे राहिले. अनेकांनी हे चित्र मोबाईलच्या कॅमे-यात टिपले; पण या तिघांनी एकमेकांकडे पाहणेही टाळले. मग दस-याच्या शुभेच्छा देणे तर दूरच अन् संयोजकांचा निरोप घेऊन सगळे प्रचाराच्या कामाला लागले; पण या झालेल्या कार्यक्रमाची चर्चा मात्र अजून सुरू आहे.
पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच उपस्थित...
शिवप्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येक वर्षी या सांगता कार्यक्रमाला आम्ही सर्वच प्रतिष्ठितांना निमंत्रित करतो. उदयसिंह पाटील तर गेली तीन वर्षे येतात. डॉ. अतुल भोसलेही यापूर्वी एकदा आले होते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यंदा प्रथमच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत, असे संयोजकांच्यावतीने केदार डोईफोडे यांनी सांगितले.
क-हाड उत्तर मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. पैकी धैर्यशील कदम स्वत: उपस्थित होते. तर आमदार बाबाळासाहेब पाटील यांचे प्रतिनिधित्व पुतणे नगरसेवक सौरभ पाटील यांनी केले. तर मनोज घोरपडेंनी सातारा तालुक्यातील नागठाणे येथील दुर्गादौडला उपस्थित राहणे पसंद केले.
क-हाड येथे बुधवारी दुर्गादौडच्या सांगता समारंभप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील-उंडाळकर, धैर्यशील कदम आणि डॉ. अतुल भोसले हे क-हाड दक्षिण आणि उत्तरचे उमेदवार उपस्थित होते. मात्र, त्यांच्यात दुरावा आणि अबोला कायम होता.