घरासाठी जागा देता का हो जागा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:02+5:302021-01-13T05:42:02+5:30
नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आयुष्यभर पै-पै जमा करून माणूस घर बांधतो. त्या घरामध्ये राहण्याचा आनंदच वेगळा ...
नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आयुष्यभर पै-पै जमा करून माणूस घर बांधतो. त्या घरामध्ये राहण्याचा आनंदच वेगळा असतो. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या घरकुलासाठीही अनेकांची धडपड असते. मात्र, जिल्ह्यातील १८०० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर असूनही चार वर्षांपासून ते बांधण्यासाठीच जागा मिळालेली नाही. तसेच मागणी जागेचे प्रस्तावही अनेक विभागांकडे धूळ खात आहेत. त्यामुळे प्रशासनाला जाग येणार का, हाच प्रश्न आहे.
सामान्य, गरीब आणि गरजूंच्या निवाऱ्यासाठी शासनाकडून अनेक घरकुल योजना राबविण्यात येतात. राज्य आणि केंद्र शासनाच्यावतीने यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, काहीवेळा निधीअभावी ही घरकुले वेळेत पूर्ण होत नाहीत. शासनाच्या लाल फितीचाही या घरकुलांना फटका बसतो. अशाचप्रकारे आता जिल्ह्यातील १८०२ घरे, जागा मिळत नसल्याने रखडली आहेत.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात घरकुले बांधण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना १ लाख २० हजार रुपये घरकुलासाठी अनुदान मिळते. यामध्ये संबंधितांनी घराचे किमान २६९ चौरस फूट बांधकाम करणे आवश्यक असते. तसेच शौचालय बांधणीसाठी १५ हजार रुपये मिळतात. एवढ्या तरतुदीत घर होत नाही. त्यामुळे घरकुल मोठे करायचे असेल, तर वरील जादा खर्च हा लाभार्थ्यांना स्वत: करावा लागतो. लाभार्थ्यांना स्वत:च्या जागेवरही तसेच शासकीय जागेवरही घर बांधता येते. तसेच जागा खरेदी करून घरकुल बांधायचे झाले तरी शासनाकडून ५० हजार रुपये मिळतात.
२०१६-१७ पासून जिल्ह्यात प्रधानमंत्री योजनेंतर्गत २१२५ घरकुलांना जागा उपलब्ध नव्हती. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर कुठे ३२३ जणांना घरकुलांसाठी जागा मिळाली. तरीही सद्यस्थितीत १८०२ लाभार्थ्यांना अद्यापही जागा मिळालेली नाही. त्यामुळे संबंधितांना घरकुलच बांधता आलेले नाही. शासनाच्या जागेवर घर बांधता येते, जागा मोफत मिळते. पण, ही जागा मिळण्यासाठी अनेक प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. यावरील धूळ कधी झटकणार, हा प्रश्न आहे. तरच अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
चौकट :
जागेचे पेंडिंग प्रस्ताव...
घरकुल बांधण्यासाठी जागा मिळावी यासाठी अनेक लाभार्थ्यांनी विविध विभागांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील महसूल विभागाकडे २३७, ग्रामपंचायत विभागाकडे ४०, शेती महामंडळाकडे १८५, सार्वजनिक बांधकामकडे २१, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे ७५ आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ४ प्रस्ताव पेंडिंग आहेत.
................................
चौकट :
लाभार्थ्यांत आशेचा किरण, पण...
एक महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेत महा आवास अभियानाची कार्यशाळा झाली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांसह विविध अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांनी, सर्वांसाठी घरकुल खूप महत्त्वाचे असते. घरकुलांच्या जागेबाबत तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लाभार्थ्यांत आशेचा किरण आहे. पण, हे लवकरात लवकर व्हावे, अशी भावना लाभार्थ्यांची आहे.
....................................................................