बेदम मारहाण करून पत्नीचा खून, चारीत्र्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:39 PM2019-06-19T13:39:45+5:302019-06-19T13:42:10+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पतीने बेदम मारहाण करीत पत्नीचा खुन केला. बनवडी ता.कऱ्हाड येथे मंगळवारी रात्री हि घटना घडली. या प्रकरणी पतीला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली आहे.
कऱ्हाड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने बेदम मारहाण करीत पत्नीचा खुन केला. बनवडी ता.कऱ्हाड येथे मंगळवारी रात्री हि घटना घडली. या प्रकरणी पतीला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली आहे.
प्रतीभा उर्फ जयश्री जालिंदर वाघमारे (वय ३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती जालिंदर प्रताप वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील हेळगाव येथील जालिंदर वाघमारे हा बनवडी येथे भाडेतत्वावर खोली घेऊन पत्नी प्रतीभा हिच्यासह वास्तव्यास होता.
जालिंदर आणि प्रतिभा यांच्या विवाहाला अनेक वर्ष झाली आहेत. मात्र, त्यांना अपत्य नव्हते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होता. तसेच जालिंदर हा प्रतिभाच्या चारीत्र्यावरही संशय घेत होता. मंगळवारी दुपारी तो एका घरात मद्यप्राशन करीत बसला होता. त्यावेळी प्रतिभा त्याठिकाणी आली. तीने त्याला दारू पिण्यास अटकाव केला. त्यावेळी जालिंदरने प्रतिभाला मारहाण केली. त्यानंतर दिवसभर तो वारंवार तिला मारहाण करीत होता.
दरम्यान, रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा वाद झाल्यानंतर जालिंदरने प्रतिभाला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यामध्ये जागीच तीचा मृत्यू झाला. प्रतिभाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर तो थेट पोलीस ठाण्यात गेला.
घटनेची माहिती त्यानेच पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत घटनास्थळ गाठले. पंचनामा झाल्यानंतर पहाटे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच बुधवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.