पेट्री : वनपाल श्रीरंग शिंदे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रम झाला. दरम्यान, वनविभागात नोकरी करताना ती फक्त नोकरी म्हणून न करता वनालाच आपले कुटुंब मानल्याने कास-बामणोली परिसरातील अफाट जैवसंपदेचे ज्ञान वनपाल श्रीरंग शिंदे यांना लाभले. हे ज्ञान त्यांनी सर्वांना दिले. त्यांचे वनविभागातील कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार वनविभागाचे फिरत्या पथकाचे प्रमुख सचिन डोंबाळे यांनी काढले.
तीनशेपेक्षा अधिक वनस्पतींची माहिती, कास पठारावरील जैवविविधतेचा गाढा अभ्यास असणारे श्रीरंग शिंदे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमास सहायक वनसंरक्षक गोसावी, किरण कांबळे, मेढ्याचे वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सचिन डोंबाळे म्हणाले, ‘शिंदे यांनी कमी शिक्षण असतानाही जे वनस्पती ज्ञान प्राप्त केले ते अमूल्य आहे. इतर वनरक्षकांनी याचा आदर्श घेऊन आचरण करावे. वेळोवेळी शिंदे यांच्याकडून माहिती घेऊन वनविभागाचे नाव उज्ज्वल करावे. जैवविविधता टिकविण्यासाठी जगनजागृती करावी. श्रीरंग शिंदे यांनी खात्यासाठी जसे कार्य केले तसेच सर्वांनी करावे.’
सहायक वनसंरक्षक किरण कांबळे म्हणाले, ‘मुलगा निवृत्त होताना त्यांचे आई-वडील हजर असणे हे भाग्य असावे लागते. ते श्रीरंग शिंदे यांना लाभले. वनस्पतींची शास्त्रीय नावे, त्या वनस्पती ओळखणे, त्यांची माहिती देणे या बाबतीत श्रीरंग शिंदे यांनी नवीन कल्पना तयार कराव्यात. सेवानिवृत्तीनंतरही आपले कार्य चालू ठेवावे.’ कार्यक्रमास शिंदे यांच्या कुटुंबीयांसह वनकर्मचारी उपस्थित होते.
०८पेट्री सत्कार
वनविभागातून सेवानिवृत्तीनिमित्त श्रीरंग शिंदे यांचा सत्कार करताना सचिन डोंबाळे व इतर अधिकारी उपस्थित होते.