रहिमतपूरचा पंधरा वायरमनांवर ३७ जणांच्या कामाचा लोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:52 PM2018-06-13T22:52:51+5:302018-06-13T22:54:00+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे.
रहिमतपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वायरमन तणावाखाली कामकाज करत आहेत. दरम्यान, उपविभागाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचे पदही सुमारे वर्षभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अतिरिक्त कामकाज पाहणारे कर्मचारीही ‘हाय होल्टेज’ तणावाखाली आहेत.
वीज वितरणच्या रहिमतपूर उपविभाग कार्यालयांतर्गत परिसरातील सुमारे ४१ गावांत कामकाज चालते. घरगुती वीज कनेक्शन, शेतीपंप वीज कनेक्शन यासह आदी विविध काम दररोज नियमितपणे सुरू असतात. याबरोबरच पावसामुळे, अपघातामुळे तसेच काही कारणामुळे नादुरुस्त झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम कर्मचारी करत असतात. रहिमतपूर शहरासह परिसरातील ४१ गावांतील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वायरमन तांत्रिक कर्मचारी यांची संख्या पुरेशी असणे गरजेचे असते. मात्र अत्यंत अल्प कर्मचाऱ्यांच्या बळावर सध्या हे कामकाज सुरू आहे.
रहिमतपूर शहर परिसरासाठी १७ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या केवळ ४ वायरमन उपलब्ध असून, १७ पदे रिक्त आहेत. रहिमतपूर ग्रामीण परिसरासाठी १३ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र ५ वायरमन उपलब्ध असून, ८ पदे रिक्त आहेत. वाठार किरोली परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर असून, केवळ २ वायरमन उपलब्ध आहेत. या ठिकाणी ९ पदे रिक्त आहेत. तारगाव परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर आहेत. मात्र ४ वायरमन उपलब्ध असून, ७ पदे रिक्त आहेत.
उपविभागात उपलब्ध असलेल्या पंधरा वायरमनच्या अंगावर ३७ वायरमनच्या कामाचा लोड दिला आहे. अतिरिक्त कामाच्या लोडमुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत आहेत.
अनेकदा अपुºया कर्मचाºयांच्या संख्येमुळे ज्या ठिकाणी दोन कर्मचाºयांची गरज आहे. त्या ठिकाणी धोका पत्करून एकच कर्मचारी काम करताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी सचिन फाळके नावाचे वायरमन यांचा शॉक लागून मृत्यू झाला. विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करताना कर्मचाºयाचा जीव वाचला असता. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वीज वितरणच्या अधिकाºयांनी तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी कर्मचाºयांसह नागरिकांतून होत आहे.
रिक्त जागा भरणे गरजेचे ....
रहिमतपूर उपविभाग कार्यालयाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंता पद गेल्या सात महिन्यांपासून रिक्त आहे. सहायक अभियंता यांच्याकडे उपकार्यकारी अभियंता म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दोन टेबलची कामे करावी लागत आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या कामासह रहिमतपूर ग्रामीण शाखेचे पूर्ण कामकाज पाहावे लागत आहे. हे पद सप्टेंबर २०१६ पासून रिक्त आहे. तसेच वाठार किरोली येथील गुण नियंत्रण कक्षाची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांवर देण्यात आली आहे. त्यांनाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. जिल्हा कार्यालयाकडे या रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात, अशी अनेकदा मागणी करण्यात आली आहे.