सातारा : साताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे, असा टोला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदयनराजेंना लगावला, तसेच दहा वर्षे दिल्लीत राहून काम करण्याची चांगली संधी त्यांनी सोडल्याची खंत वाटते, अशा शब्दांतही त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.जिल्हा मध्यवर्ती बँंकेत झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर विश्रामगृहावर मोजक्या पत्रकारांशी बोलताना रामराजेंनी हे वक्तव्य केले. लोकसभेसाठी मलाच उमेदवारी मिळणार, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी कऱ्हाडयेथे व्यक्त केले होते. त्या वक्तव्याचा रामराजेंनी समाचार घेतला.लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची, ते पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार ठरवतील. अद्याप कोणाचेही नाव फायनल झाले नाही. दिल्लीला आम्हालाही जाता येते, अशी टिप्पणी रामराजेंनी केली. रामराजे म्हणाले, आम्ही जिल्ह्यात नसल्यामुळे अनेकांच्या कॉलर वर होतात.
साताऱ्यातून कोणाला उमेदवारी दिली अथवा नाही दिली, याची शरद पवारांकडून आम्ही माहिती घेऊ शकतो. आम्ही दुसरे कोणाला नाही, केवळ शरद पवारांशी बांधील आहोत. कोणी किती विरोध केला तरी माझी उमेदवारी राष्ट्रवादीतून फायनल आहे.गल्लीतील गोंधळापेक्षा मी दिल्लीतील निर्णयाला महत्त्व देतो, या उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत विचारले असता रामराजे म्हणाले, पक्षाच्या उमेदवारीचा निर्णय स्वत: खासदार शरद पवार घेतील. त्यांच्या विचारांशी आम्ही बांधील आहोत.कर्नाटक राज्यातील निकालानंतर खासदार शरद पवार राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतील. त्यांच्याप्रमाणे दिल्लीला आम्हालाही जाता येते. जिल्ह्यात आम्ही नसलो की अनेकांच्या कॉलर उडतात, असे विधान करत उदयनराजेंचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.दरम्यान, पक्षाची उमेदवारी कोणाला?, हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला असता राष्ट्रवादीतून मानकुमरे इच्छुक आहेत, असे त्यांनी सांगितले. मानकुमरे यांनीही आपण तयार आहे. अद्यापही शरद पवार यांनी उमेदवारी संदर्भात आमच्याशी चर्चा केलेली नाही. ते जो उमेदवार देतील, त्याचे सूचक आणि अनुमोदक व्हायला आम्ही तयार आहोत.