जलजीवनमधून ५४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:09+5:302021-06-26T04:27:09+5:30
जिल्हा परिषद... लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य ...
जिल्हा परिषद...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनांसाठी २६ कोटी ५० लाखांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. तर पाणी योजनांत कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक गावे आहेत.
जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत लोकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाणी योजना राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यातील ५४ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे निविदा निघाल्यानंतर कामे सुरू होतील.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ५४ गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये सर्वाधिक गावे ही कऱ्हाड तालुक्यातील असून यानंतर फलटण, खंडाळा, सातारा, पाटण जावळी, महाबळेश्वर आणि कोरेगाव या तालुक्यांचा क्रमांक लागतो. ५४ पाणीपुरवठा योजनांसाठी २६ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
पाणीपुरवठा योजनांतर्गत कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी, भुरभुशी, घोगाव, किवळ, साळशिरंबे, सुर्ली, वडोली, निळेश्वर आदी गावांच्या योजनांची कामे होतील. तर खंडाळा तालुक्यात शिवाजीनगर, पिसाळवाडी, वाठार बुद्रुक, आसवली तर फलटण तालुक्यात आदर्की बुद्रुक, बिबी, गोखळी, दुधेबावी आदी गावांतील पाणी योजनांची कामे होणार आहेत. सातारा तालुक्यातील जांबगाव, रामकृष्णनगर, शिवथर आदी तर पाटणमधील कराटे, मरळी आदी गावांतील पाणी योजना कामे करण्यात येणार आहेत.
कोट :
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५४ गावांच्या पाणीपुरवठा योजना कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या पाणीपुरवठा योजना कामांचे टेंडर काढण्यात येईल. त्यानंतर योजनांची कामे सुरू होणार आहेत.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी
..................................................................