वाई विषय समिती सदस्य, सभापती निवडी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:40 AM2021-01-23T04:40:13+5:302021-01-23T04:40:13+5:30
वाई : नगर परिषदेच्या विषय समिती सदस्य व सभापती निवडी रद्द करून सभा तहकूब करण्यात आली. राष्ट्रवादीप्रणीत तीर्थक्षेत्र ...
वाई : नगर परिषदेच्या विषय समिती सदस्य व सभापती निवडी रद्द करून सभा तहकूब करण्यात आली. राष्ट्रवादीप्रणीत तीर्थक्षेत्र विकास आघाडी रजिस्टर नसल्याने त्यांची नामनिर्देशन पत्रे पुन्हा मागीळ वेळेप्रमाणे यावेळेसही फेटाळून लावली. त्यावेळी वाई विकास महाआघाडीच्या सदस्यांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरूनही पुरेसे संख्याबळ नसल्याने समिती गठीत होऊ शकली नाही.
वाई नगरपालिकेच्या विशेष सभेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर या होत्या. यावेळी वाई विकास महाआघाडीने आपल्या सदस्यांच्या नियुक्तीचे पत्र गटनेेते सतीश वैराट यांच्या सहीने पीठासन अधिकाऱ्यांकडे वेळेत सुपुर्द केले होते. सभेला सुरुवात झाल्यावर पीठासन अधिकारी यांनी समिती निवडीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या एकाही सदस्याला या विषय समितीत कोणत्याही परिस्थितीत सदस्यत्व देता येणार नसल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीप्रणीत तीर्थक्षेत्र विकास आघाडी रजिस्टर नसल्याने सर्व सदस्यांची नामनिर्देशन पत्रे पुन्हा मागील वेळेप्रमाणे यावेळेसही फेटाळून लावली. वाई विकास महाआघाडीच्या सदस्यांनी सादर केलेली नामनिर्देशन पत्र वैध ठरली. त्यानंतर आवश्यक संख्याबळाचा विचार करून पूर्णांकासाठी एक व अपूर्णांकासाठी एक असे प्रत्येकी दोन सदस्य अनुक्रमे आरोग्य समिती व पाणीपुरवठा समितीमध्ये नियुक्त केले. परंतु तिसऱ्या सदस्यासाठी आवश्यक असेलेले संख्याबळ नसल्याचे कारण पुढे करून कोणतीही समिती गठित न करता ही सभा संपल्याचेही जाहीर केले.
दरम्यान, पीठासन अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात वाई विकास महाआघाडी योग्य त्या कायदेशीर बाबी तपासून विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे न्याय मागणार आहे, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.