मायणी : जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, परिसरातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. मात्र, खटाव तालुक्याची मुख्य जलवाहिनी असलेल्या येरळा नदीचे पात्र येरळवाडी मध्यम प्रकल्पापासून दक्षिणेला कोरडे पडले आहे. त्यामुळे हा परिसर आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिसरातील सर्व ओढे-नाले, नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळत असल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे, अशी विदारक परिस्थिती एका बाजूला आहे.
जिल्ह्याचा पूर्व भाग कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. खटाव तालुक्यातील अनेक गावे आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याची मुख्य जलवाहिनी म्हणून येरळा नदीला ओळखले जाते. या नदीवर असलेले येरळवाडी व नेर हे दोन मध्यम प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या (तलावाच्या) दक्षिण बाजूला अंबवडे, गोरेगाव, मोराळे, चितळी व सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत असलेले येरळा नदीपात्र आजही पूर्ण कोरडे आहे.
येरळा नदीच्या परिसरासह मायणी मंडलमधील मायणीसह, कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, विखळे, हिवरवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, पडळ, औतरवाडी, ढोकळवाडी, गारुडी, तरसवाडी, गारळेवाडी गावांच्या परिसरातील अनेक वाड्या-वस्त्या आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
२४ मायणी
चितळी (ता. खटाव) येथील येरळा नदीपात्र आजही पूर्ण कोरडे आहे. ( छाया : संदीप कुंभार)