गाणगापूरला देवदर्शनाला गेलेला जुंगटीचा युवक नदीत बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 02:54 PM2019-11-14T14:54:12+5:302019-11-14T14:55:00+5:30
सातारा तालुक्यातील जुंगटी येथील पांडुरंग भागुजी कोकरे हा युवक तीन दिवसांपूर्वी काही सहकाऱ्यांसमवेत गाणगापूरला देवदर्शनाला गेला होता. गाणगापूर येथील नदीवर तो बुधवारी सकाळी अंघोळीला गेला असता बुडाला. त्याचा शोध सुरू आहे.
बामणोली : सातारा तालुक्यातील जुंगटी येथील पांडुरंग भागुजी कोकरे हा युवक तीन दिवसांपूर्वी काही सहकाऱ्यांसमवेत गाणगापूरला देवदर्शनाला गेला होता. गाणगापूर येथील नदीवर तो बुधवारी सकाळी अंघोळीला गेला असता बुडाला. त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुंगटी या गावातील पांडुरंग भागुजी कोकरे (वय ३२) हा मुंबईमध्ये टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असत. तो सोमवारी त्यांच्या आठ ते दहा सहकाऱ्यांसमवेत मुंबईहून गाणगापूरला देवदर्शनाला गेला होता. मंगळवारी देवदर्शन करून तो बुधवारी सायंकाळी माघारी परतणार होता. तो बुधवारी सकाळी आठच्या सुमारास सहकाऱ्यांसमवेत गाणगापुरातील तीर्थस्थळाशेजारील नदीत अंघोळीला गेला.
तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला असल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली. या घटनेची नोंद तेथील पोलीस ठाण्यात झाली असून, अद्याप तपास लागला नाही. तेथील तरुण व प्रशासनाने शोधकार्य सुरूच ठेवले आहे. या घटनेची महिती कळताच ग्रामस्थांसह नातलगांनी गाणगापूरकडे धाव घेतली.