अकॅडमीचा खर्च परवडेना; सराव करताना मनोबल खचतंय
सातारा : पोलीस भरतीचा जीआर शासनाने रद्द केला आहे. त्यामुळे पोलीस भरतीचा सराव करणारे युवक नाराज झाले आहेत. पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेच राहतेय की काय? अशी चिंता तरुणांना लागली आहे. काही तरुणांचे वय संपत आल्याने युवक अक्षरश: हतबल झाले आहेत.
पोलीस दलात भरती होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तरुण सराव करत आहेत. अनेकांनी खासगी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. यासाठी त्यांचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. गेल्या वर्षी पोलीस भरती होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही भरती पुढे ढकलण्यात आली. परिणामी जिल्हा पोलीस दलाला मनुष्यबळ उपलब्ध होण्यात अडथळा झाला आहे. पोलीस भरतीचे नव्याने परिपत्रक प्रसिद्ध करण्यात यावे, जेणेकरून भरतीचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली आहे. पोलीस दलात भरती होण्यासाठी मोठ्या संख्येने युवतीही इच्छुक असून, त्याही रोज सराव करत आहेत.
एक हजार नागरिकांमागे एक पोलीस
जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाखांवर आहे, तर पोलीस केवळ साडेतीन हजार आहेत. त्यामुळे एक हजार नागरिकांमागे केवळ एक पोलीस उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत गुन्हे कसे रोखायचे, असा प्रश्न पोलिसांसमोर आवासून उभा आहे. मात्र, तरीसुद्धा पोलिसांकडून चांगल्या प्रकारे काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलीस भरती होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मी सराव करत आहे. जवळपास माझी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, आता भरतीच होणार नसल्याने खूप नाराज झालो आहे. गेल्या वर्षीही भरतीसाठी फाॅर्म भरला होता; परंतु भरती कोरोनामुळे होऊ शकली नाही. आता येत्या काही महिन्यांत भरती होईल, अशी आशा व्यक्त करतो.
- रामदास साळुंखे
कोरेगाव,
पोलीस भरती रद्द झाल्यामुळे आमचा अकॅडमीतील खर्चही वाढला आहे. भरती होणार असल्याने रोजचा सराव सुरू होता. आता सराव करू वाटत नाही. भरती कधी होईल, याची शाश्वती नाही. शासनाने युवकांच्या वयाचा विचार करून तातडीने भरती प्रक्रिया अमलात आणावी.
- प्रदीप माने
विसावा नाका, सातारा
पोलीस भरतीसाठी मोठी स्पर्धा आहे. गत वर्ष लाॅकडाऊनमध्ये गेले. आता दुसरं वर्ष पण असेच जाईल की काय? अशी धास्ती आम्हाला वाटू लागलीय. शासनाने युवकांचे करिअर संपुष्टात आणण्याचा विचार केला आहे का, अशी शंका येतेय.
- अनिकेत कदम, पाटण