जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक देणार आरोग्य केंद्रांना ५५ व्हेंटिलेटर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:03 AM2021-05-05T05:03:49+5:302021-05-05T05:03:49+5:30
सातारा : कोरोना महामारीने सर्वांना संकटात टाकले आहे. या संकटात अनेक जण आपापल्या परीने मदत करीत आहेत. आता जिल्हा ...
सातारा : कोरोना महामारीने सर्वांना संकटात टाकले आहे. या संकटात अनेक जण आपापल्या परीने मदत करीत आहेत. आता जिल्हा परिषदेचे कर्मचारी, प्राथमिक शिक्षक हे प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन ५५ ते ६० व्हेंटिलेटर मशीन जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना देणार आहेत. यामुळे रुग्णांचा जीव वाचणार आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या पुढाकारातून बैठक झाली.
जिल्ह्यात गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीचे संकट सुरू आहे. सध्या तर दररोज हजारोंच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसेच मृतांचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा काम करीत असली तरी बेड्स, व्हेंटिलेटर मशीन कमी पडत आहेत. याचा विचार करून जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या साताऱ्यातील निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येकी दोन हजार रुपये रक्कम जमा करून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान पाच व्हेंटिलेटर मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर शुक्रवारी सर्व तालुक्याचे सभापती, गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन केंद्रवार निधी जमा करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे ठरविण्यात आले. यामुळे कोरोना विरोधातील लढ्याला बळ मिळणार आहे.
कोट :
जिल्ह्यात कोरोना संकट सुरू आहे. आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. पण, अनेकवेळा व्हेंटिलेटर मशीन कमी पडतात. याचा विचार करून जिल्हा परिषदेचे कर्मचारी व शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काही व्हेंटिलेटर मशीन देण्याचा निर्णय झाला. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. तसेच भविष्यातही याचा उपयोग होणार आहे.
- उदय कबुले, अध्यक्ष जिल्हा परिषद
फोटो दिनांक ०४सातारा झेडपी मीटिंग फोटो नावाने...
फोटो ओळ : सातारा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक झाली.