स्वच्छता अभियानांतर्गत तळेरे परिसरातून २१ टन कचरा गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:55 PM2017-10-02T16:55:00+5:302017-10-02T17:00:01+5:30
तळेरे : देश पातळीवर गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात येणाºया स्वच्छता अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील तळेरे एस. टी. बसस्थानक ते स्मशानभूमीपर्यंतचा परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ केला. सुमारे १ किलोमीटर अंतर मार्गाच्या दुतर्फा असलेला २१ टन कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये तळेरे, नडगिवे, मुटाट, पाळेकरवाडी येथील २३० श्री सदस्य सहभागी झाले होते.
गांधी जयंतीनिमित्त तळेरे परिसरात श्री सदस्यांनी ही स्वच्छता मोहीम राबविली. तळेरे एस. टी. स्थानक परिसर, बाजारपेठ ते स्मशानभूमी असा सुमारे १ किलोमीटर अंतर परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छता अभियानाचे राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. हे स्वच्छता अभियान हा सामर्थ्याचा भाग असल्याने बैठकीतील श्रीसदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार तळेरे परिसरात श्रीसदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.
स्वच्छता मोहिमेचे कौतुक
विशेष म्हणजे या स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या प्रत्येकामध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. त्या सर्वांची शिस्त, कार्य करण्याची पद्धत, कार्याबाबतची आवड व त्यांची तत्परता वाखाणण्याजोगी होती. स्वच्छतेसारखा राष्ट्रीय उपक्रम साध्य करण्यासाठी स्वेच्छेने एवढ्या मोठ्या संख्येने हजर राहिलेल्या व्यक्तींचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत होते.
या स्वच्छता मोहिमेमध्ये श्री सदस्यांसह तळेरे आदर्श व्यापारी संघटना सहभागी झाली होती. या स्वच्छता मोहिमेबद्दल तळेरे ग्रामपंचायतीने श्री सदस्यांना पत्र देऊन विशेष आभार मानले. तसेच तळेरे आदर्श रिक्षा संघटनेच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.