कणकवली तालुक्यातील ३७५४ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी पासून वंचित
By सुधीर राणे | Published: December 21, 2023 04:48 PM2023-12-21T16:48:35+5:302023-12-21T16:49:01+5:30
कणकवली: कणकवली तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी २१ हजार ५५० शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यातील १९ हजार ८९३ एवढ्या ...
कणकवली: कणकवली तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी २१ हजार ५५० शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यातील १९ हजार ८९३ एवढ्या शेतक-यांची ई - आधार लिंक असल्याने त्यांना सन्मान निधी प्राप्त होत आहे. मात्र तालुक्यातील १ हजार ६५७ शेतकऱ्यांचे ई - आधार लिंक प्रलंबित आहे.
तसेच २ हजार ९७ शेतकऱ्यांचे आधार सिंडींग , एनपीसीआय मॅपिंग , डीबीटी एनेबल करणे अपूर्ण असल्याने त्याना पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यात ३ हजार ७५४ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी पासुन सध्या वंचित आहेत. अशी माहिती कणकवली तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे यांनी दिली.
या शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीमधील शेतक-यांच्या त्रुटी दुर करण्यासाठी कृषी विभाग व शेतक-यांना बॅंकांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे २३ व २५ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभांमधून पंतप्रधान किसान सन्मान निधी बाबतच्या त्रुटी सांगून शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कणकवली तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत त्रुटी असलेल्या शेतक-यांच्या याद्या कृषी सहायकांमार्फत ग्रामसहायकांना दिलेल्या आहेत. त्यानुसार कृषी सहायक शेतक-यांच्या त्रुटींची पुर्तता करण्यासाठी गावागावांत जनजागृती करत आहेत. संबंधित त्रुटी काय आहेत? याबाबत शेतक-यांकडे गेल्यानंतर ओटीपी जातो त्यावेळी वयोवृध्द शेतकरी ओटीपी व आधारकार्ड नंबर देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे काही शेतकरी लाभापासुन वंचित राहण्याची शक्यता आहे.