बांद्यात 40 ते 50 माणसे घरामध्ये अडकली, बाजारपेठेसह घरे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:17 PM2019-08-06T15:17:59+5:302019-08-06T15:45:46+5:30
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक गाव संपर्कहीन झाली आहेत.
सावंतवाडी : संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक गाव संपर्कहीन झाली आहेत. सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरातील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. शहरातील अनेक दुकानात पाणी शिरले आहे तर महामार्ग नजीकच्या घरांमध्ये पाणी घुसले असून, अनेकांनी आपले कुटुंब मध्यरात्रीच स्थलातंर केले असले तरी बांदा गवळीटेब येथील लक्ष्मी विष्णू संकुलात तब्बल 30 ते 40 ग्रामस्थ अडकले होते. त्यांना अल्मेडा यांच्या टीमने बाहेर काढले उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता, तसेच पाण्याची पातळी ही वाढत होती, त्यामुळे ग्रामस्थामध्ये मध्ये घबराट होती.
गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यातच सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे होडावडे पुलपाण्याखाली गेला आहे. ओटवणे असनिये भागात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं अनेक गावे जलमय झाली आहेत. मुसळधार पावसाचा जोरदार फटका बांदा इन्सुली शेर्ले या गावांना बसला आहे.
बांदा बाजारपेठ तर पूर्णता पाण्याखाली गेली असून जवळपास 100 दुकानांमध्ये पाणी घुसले आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने दुकानांमधील संपूर्ण सामान पाण्याखाली गेले आहे. एसटी स्टँड परिसर पूर्णता पाण्यात असून बांद्याचे जुने फुल ही पाण्याखाली गेले आहे. झाराप पत्रादेवी महामार्गाजवळ असलेल्या बांदा व शेर्ले येथील घरे पूर्णता पाण्याखाली गेली आहेत.
अनेक घरातील कुटुंबांना मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर काढून इतरत्र हलवण्यात आले, तर बांदा गवळीटेंब येतील लक्ष्मी विष्णू संकुलातील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पाणी आल्याने तब्बल 40 ते 50 माणसे घरातच अडकून पडली होती. यात वृद्ध महिला लहान मुले यांचा समावेश होता. या सर्वांना बाबल अल्मेडा यांच्या टीमने बाहेर काढले सांगेली येथून आल्मेडासह त्याच्या पथकातील सर्व जण बांदा येथे 11 वाजण्याच्या सुमारास बांदा येथे दाखल झाले, त्यानंतर त्यानी स्थानिक ग्रामस्थ युवकांच्या मदतीने अडकलेल्यांना बाहेर काढले. यावेळी बांदा उपसरपंच अक्रम खान गुरू सावंत प्रकाश पाटील यांनी या टीमसोबत काम केले.