सिंधुदुर्ग : नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू होऊन २१ दिवसांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील अद्यापही ५० शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद असल्याचे एका माहितीच्या आधारे समोर आले आहे.
४२ हजार ४२४ विद्यार्थ्यांपैकी आजपर्यंत केवळ ११ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. तर ३१ हजार ९८ विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. या कालावधीत २९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व २ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळा सुरू करण्याचा सर्वस्वी निर्णय शासनाने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या कोर्टात टाकला. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निम्म्यापेक्षा जास्त पालकवर्गांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
माध्यमिक शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची शासनाने कोविड चाचणी बंधनकारक केली होती. त्यानुसार २२४५ शिक्षकांपैकी २० शिक्षक तर ९२७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ९ असे एकूण २९ जण पॉझिटिव्ह आले होते. तर शाळा सुरू झाल्यानंतर २ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते.
विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती न विद्यार्थ्यांची कोविडची चाचणी केली असता ते २ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले. सुदैवाने त्यांच्या संपर्कात आलेला कोणताही विद्यार्थी पॉझिटिव्ह आला नाही. सध्या या ५० शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत.बहुतांश विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठजिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या २४७ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी २३ नोव्हेंबर रोजी ८५ शाळा सुरू झाल्या होत्या. पहिल्याच दिवशी सुमारे ५ हजार विद्यार्थी उपस्थित होते.
शाळा सुरू होऊन २१ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अजूनही बहुतांश विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे. केवळ ११ हजार ३२६ विद्यार्थी शाळेत जात आहेत. तर उर्वरित ३१ हजार ९८ विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी शाळेच्या दिशेला फिरकलेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पत्रव्यवहार सुरूशाळा सुरू झाल्यानंतर व आताचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता खूप चांगला आहे. दिवसेंदिवस शाळेत विद्यार्थी संख्या वाढत चालली आहे. मुलांच्या उपस्थितीबाबत मुख्याध्यापक यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. ग्रामीण भागातील मुलींना मोफत प्रवास पास मिळावा यासाठी एसटी आगार व्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.- अशोक कडुस, शिक्षणाधिकारी (माध्यमिक),सिंधुदुर्ग