कणकवली : कोरोना महामारीच्या काळातही महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत व अविरतपणे देण्यात येत असून, गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील तब्बल ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली उपविभागात ४,१८३, कुडाळ उपविभागात ४,०८२ अशा मिळून ८,२६५ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आवश्यक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित वीजजोडण्याही ताबडतोब देण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार साधारणतः ९ ते १० लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग मंदावला होता. तरीही इतर वीजसेवांप्रमाणेच नवीन वीजजोडणी देण्याच्या कामात खंड पडला नाही. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत.यात सर्वाधिक कोकण प्रादेशिक विभागामध्ये २ लाख ८५ हजार ३३२ तर पुणे प्रादेशिक विभागात २ लाख २८ हजार ६९३, नागपूर प्रादेशिक विभागात १ लाख ६५ हजार १८१ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात १ लाख २३ हजार ५७१ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा कमी करण्यासाठी महावितरणकडून सिंगल फेजचे १८ लाख व थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादारांना याआधीच देण्यात आले आहेत.ऑनलाईन प्रक्रियाउच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर वर्गवारीतील ६ लाख २७ हजार ५२९ वीज ग्राहकांना एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत १ लाख ८२ हजार ५४१ नवीन वीजजोडण्या, जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच कृषी अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. त्याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्याची अंतर्गत प्रक्रियादेखील ऑनलाईन करण्यात आली आहे.