कणकवली, 5 : कणकवली तालुक्यातील दारूम व देवगड तालुक्यातील नाद या गावांमध्ये बेसुमार जंगलतोड होत असल्याबद्दल मनसेचे कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. वन विभागाने विनापरवाना जंगलतोड करणाºयांवर कारवाई न केल्यास मनसे आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी दिला आहे.
बेसुमार जंगलतोडीबाबत वनक्षेत्रपाल जानवली यांच्याकडे दत्ताराम बिडवाडकर यांनी तक्रार केली आहे. वनक्षेत्रपाल जानवली यांना दिलेल्या निवेदनात बिडवाडकर यांनी म्हटले आहे की, कणकवली तालुक्यात बेसुमार जंगल व खैर तोड होत आहे. त्याकडे वन विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे. विनापरवाना जंगलतोड व खैराची तस्करी करणाºयांवर कारवाई का होत नाही, असा सवाल दत्ताराम बिडवाडकर यांनी केला आहे.
दारूम व नाद गावांमध्ये विनापरवाना जंगलतोड होत असून वन विभागाने जंगलतोड करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी बिडवाडकर यांनी केली आहे. जंगलतोड करणाºयांवर कारवाई झाली नाही, तर १५ दिवसांत मनसे आंदोलन करेल, असा इशाराही बिडवाडकर यांनी दिला आहे