बांदा : पत्रादेवी अबकारी तपासणी नाक्यावर पेडणे उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रात केल्या जाणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या ७ लाख ३१ हजारांच्या दारूसह सुमारे १२ लाखांचा ट्रक असा एकूण १९ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यावेळी अंधाराचा फायदा घेत चालक जंगलातून फरार होण्यात यशस्वी झाला. मात्र, अल्पवयीन क्लिनर अधिकाऱ्यांच्या हाती सापडला. ही कारवाई शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.झटपट श्रीमंत होण्यासाठी अल्पवयीन मुले चोरटी दारू वाहतूक करीत आहेत. त्याचा प्रत्यय पेडणे येथे शनिवारी झालेल्या कारवाईत दिसून आला.
गाडीचा क्लिनर हा अल्पवयीन आहे. तर चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. त्यामुळे दारूधंद्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गोवा येथून मोठ्या प्रमाणावर अवैध दारुची वाहतूक सुरू असून तिचे विपरित परिणाम अनेकवेळा भोगावे लागत आहेत.गेल्या तीन महिन्यांतील तिसरी कारवाईबेकायदा दारू वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक (एम. एच. ४८, ए. वाय. ५९१६) ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहनदास गोवेकर व त्यांच्या पथकाने केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल हरवळकर व विभूती शेट्ये करीत आहेत. गेल्या तीन महिन्यांत या तपासणी नाक्यावर झालेली ही तिसरी मोठी कारवाई आहे.