जनतेने निवडून दिलेले सिंधुदुर्गातील सर्वच लोकप्रतिनिधी अपयशी : उपरकर यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 06:51 PM2019-05-18T18:51:19+5:302019-05-18T18:53:57+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न झालेल्या विकासकामांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलनाचा फार्स निर्माण केला जात आहे. वास्तविक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच लोकप्रतिनिधीना जनतेने निवडून दिले आहे. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यात जिल्ह्यातील फक्त एकच आमदार नाही तर सर्वच आमदार, खासदार आणि मंत्री अपयशी ठरले आहेत.अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न झालेल्या विकासकामांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलनाचा फार्स निर्माण केला जात आहे. वास्तविक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच लोकप्रतिनिधीना जनतेने निवडून दिले आहे. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यात जिल्ह्यातील फक्त एकच आमदार नाही तर सर्वच आमदार, खासदार आणि मंत्री अपयशी ठरले आहेत.अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परशुराम उपरकर पुढे म्हणाले, मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारसभा घेतल्या. त्याचा फटका निश्चितच युतीला बसेल. नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचार करताना अगदी खालची पातळी गाठली. राज्यातही युतीला फटका बसणार असल्याने धसका घेतलेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदार , माजी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची पाळी आली आहे.
केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल .अशी घोषणा केली होती. तर पावसाळ्यात राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे मुक्त रस्ते करण्याबरोबरच महामार्गाची एक लेन तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काम अपूर्णच असल्याने मंत्री नागरिकांबरोबरच त्यांच्या पदाधिकाऱ्यानाही फसवतात असे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याकडे समस्या मांडत बसण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांकडेच सरळ मागणी करून त्याची पूर्तता करून घ्यावी. मात्र, सत्ताधाऱ्याना आपण भविष्यात सत्तेत असणार नाही असे वाटत असल्याने सध्या आंदोलनाची गरज पडली आहे, असे चित्र दिसत आहे.
मनसेने महामार्ग चौपदरीकरण तसेच इतर समस्यांविरोधात यापूर्वीच आवाज उठविला होता. परंतु , मध्यतरी सर्वत्र चर्चा होती की, महामार्ग ठेकेदाराने काही नेत्यांना चारचाकी गाड्या भेट दिल्या. त्यांची वैधता संपत आल्याने पुन्हा आंदोलनाची भाषा या नेत्यांना करावी लागत आहे का? हे समजत नाही.
जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील नेते , खासदार, आमदार, पालकमंत्री हे जनतेच्या समस्या सोडवत नाहीत. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना देखील जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही.सर्वच खेळखंडोबा सुरू आहे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.
मनसेकडून सातत्यपूर्ण आंदोलने !
जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मनसेकडून सातत्यपूर्ण आंदोलने करण्यात येत आहेत. त्यांना यशही मिळत आहे. यापुढेही जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आंदोलने करेल.असे यावेळी परशुराम उपरकर यांनी सांगितले.