आंबोलीत बॅटरी आॅपरेट कार, पर्यटन सफारीसाठी निर्णय : पहिल्या टप्प्यात दहा कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 03:18 PM2018-10-16T15:18:40+5:302018-10-16T15:23:01+5:30
आंबोलीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीच्या पर्यटन सफारीसाठी बॅटरी आॅपरेट कार घेण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या माध्यमातून दहा कार घेण्यात येण्यात येणार आहेत. या सर्व कार वनविभाग स्थानिक वनसमितीकडे देणार असून, त्यांच्या माध्यमातून त्या चालविण्याचा त्यांचा विचार आहे.
अनंत जाधव
सावंतवाडी : आंबोलीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीच्या पर्यटन सफारीसाठी बॅटरी आॅपरेट कार घेण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या माध्यमातून दहा कार घेण्यात येण्यात येणार आहेत. या सर्व कार वनविभाग स्थानिक वनसमितीकडे देणार असून, त्यांच्या माध्यमातून त्या चालविण्याचा त्यांचा विचार आहे.
आंबोलीत मोठ्या प्रमाणात देशभरातून पर्यटक येत असतात. मात्र, या पर्यटकांना आंबोलीच्या पर्यटनाची ओळख हवी तशी होत नाही. तसेच आंबोलीत पर्यटन गाईडही नाही. आंबोलीच्या जंगलात बरेच काही पाहण्यासारखे आहे. मात्र, आंबोलीची ओळख असलेला धबधबाच फक्त पर्यटक पाहतात आणि निघून जातात. म्हणूनच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीच्या पर्यटन सफारीला चालना मिळावी यासाठी खास पुढाकार घेतला आहे.
पावसाळ््यात धबधबे पाहण्यासाठी लाखो पर्यटक हे शनिवारी व रविवारी येत असल्याने आंबोलीच्या घाटात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येणाऱ्या पर्यटकांनी आंबोलीतच आपले वाहन पार्किंग करावे आणि खाली बॅटरी आॅपरेट कारने यावे, अशी संकल्पना असल्याने मंत्री केसरकर यांनी या बॅटरी आॅपरेट कार आणण्याचे ठरविले आहे. या कार वनविभागाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहेत. या सर्व कार वनसमिती खरेदी करणार आहे.
वनविभागाने दीपक केसरकर यांच्याकडे ३० कारचा प्रस्ताव दिला होता. मात्र आता पहिल्या टप्प्यात मंत्री केसरकर यांनी दहाच कार खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. या खरेदीला नियोजनच्या बैठकीतही मान्यता मिळाली असून, आता पुढील प्रकिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली आहे.
बॅटरी आॅपरेट कारऐवजी सहाआसनी घ्या : वनविभागाचे मत
वनविभागाने आंबोलीत बॅटरी आॅपरेट कार घेण्याऐवजी सहा आसनी रिक्षा खरेदी करण्यात याव्यात, अशी मागणी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे केली आहे. मात्र केसरकर यांनी बॅटरी कार खरेदीवरच भर दिला आहे.
स्थानिक सहा आसनीधारक अडचणीत
जर वनविभागाने बॅटरी आॅपरेट कार किंवा सहा आसनी रिक्षा जर आंबोलीत चालविल्या तर स्थानिक सहा आसनी रिक्षा चालकांवर अन्याय होणार आहे. कारण त्याच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीवर आपोआप निर्बंध येणार आहे. त्यामुळे यावर सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे.
बॅटरी आॅपरेट कारच घेणार : दीपक केसरकर
आम्ही आंबोलीच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बॅटरी आॅपरेट कार खरेदी करणार असून, पहिल्या टप्प्यात दहा कार खरेदी केल्या जाणार आहेत. सहा आसनी रिक्षा खरेदी केल्या जाणार नाहीत. पर्यावरणदृष्ट्या हा प्रकल्प असून, वनविभाग किंवा पर्यटन यांच्या माध्यमातून या कार खरेदी केल्या जाणार आहेत.