आंबोली घाटरस्ता खचला; मोबाईलसाठीच्या केबलमुळे घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 03:43 PM2019-08-08T15:43:19+5:302019-08-08T15:43:38+5:30
घाट रस्त्यावर छोटी-मोठी मोठी दरड येण्याचे प्रकार चालू असतानाच आंबोलीतील मुख्य धबधब्यापाशी तसेच त्याच्या पुढे व मागे मोठ्या प्रमाणावर रस्ता खचण्याचे प्रकार घडले आहेत.
आंबोली : आंबोलीमध्ये गेल्या आठ दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट रस्त्यावर छोटी-मोठी मोठी दरड येण्याचे प्रकार चालू असतानाच आंबोलीतील मुख्य धबधब्यापाशी तसेच त्याच्या पुढे व मागे मोठ्या प्रमाणावर रस्ता खचण्याचे प्रकार घडले आहेत. ज्या ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तो या ठिकाणी घालण्यात आलेल्या मोबाईल केबलमुळे खचला असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे.
आंबोली ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आंबोली मुख्य धबधब्यापाशी मोठ्या प्रमाणावर रस्ता खचला आहे. आणखी एक-दोन दिवसात हा रस्ता पूर्ण खचून वाहतूक पूर्ण बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. आंबोली मुख्य धबधबा तसेच आणखी पुढे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्या ठिकाणी दूरध्वनी कंपन्यांनी मारलेल्या केबलच्या खड्ड्यांमुळे संरक्षक कठडे व रस्ते खचल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी आंबोली घाटामध्ये दरड कोसळली होती. त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा दरड खाली येत असून वारंवार अंबोली घाट रस्ता बंद होत आहे. सद्यस्थितीत आंबोली घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला असून, केवळ टू व्हीलर जातील एवढाच रस्ता चालू आहे.
तर एकीकडे चौकुळ व आंबोलीला जोडणाऱ्या पापडी या पुलावर सलग चार दिवस पाणी असल्याने चौकूळ गावाचा संपर्कही तुटला आहे. सद्यस्थितीत आंबोलीमध्ये दूध, पालेभाजी सिलिंडर यांचा तुटवडा जाणवत असून, आंबोली घाटरस्ता बंद झाल्यास येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. सद्यस्थितीत आंबोली घाट रस्त्याची पाहणी करण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी फिरकले नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तर ग्रामस्थांच्या मते सद्यस्थितीत ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे. त्याठिकाणी हुशार व लवकरात लवकर काम करणारे इंजिनीअर व आर्किटेक यांना बोलावून आणून योग्य ती उपाययोजना त्वरित करण्याची मागणी होत आहे. पाच वर्षांपूर्वी घाट कोसळला होता, त्यावेळी कुचकामी ठेकेदार व इंजिनीयर यांनी मिळून स्वतःच्या स्वार्थासाठी ज्याप्रमाणे वेळकाढूपणा केला होता, त्याप्रमाणे जर आताही वेळ काढूपणा केल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा आंबोली ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे.