कासार्डेतील वैजयंती मिराशी यांनी उभारली आनंदाची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 PM2021-04-14T16:28:58+5:302021-04-14T16:30:34+5:30
Gudhipadwa Kankvali Sindhudurg : कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडी येथील साठवर्षीय वैजयंती शांताराम मिराशी या वृद्धेच्या घरात अठराविश्व दारिद्र्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घर पडले आहे. दररोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना, तिने मंगळवारी आपल्या घरासमोर आनंदाची गुढी उभारली असली, तरीही तिला मदतीची आवश्यकता आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही.
निकेत पावसकर
तळेरे : कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडी येथील साठवर्षीय वैजयंती शांताराम मिराशी या वृद्धेच्या घरात अठराविश्व दारिद्र्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घर पडले आहे. दररोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना, तिने मंगळवारी आपल्या घरासमोर आनंदाची गुढी उभारली असली, तरीही तिला मदतीची आवश्यकता आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही.
कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती मिराशी ही साठवर्षीय वृद्ध महिला एकटीच घरात राहते. गेल्या अनेक वर्षांपासून घर बांधणीसाठी शासकीय मदत मिळावी यासाठी ती प्रयत्नशील आहे. मात्र, कोणीही दाद देत नाहीत. स्वत: काम करेल, त्याचवेळी दोनवेळचे जेवण मिळते, अशी परिस्थिती असताना, शासकीय मदतीची अजूनही प्रतीक्षाच आहे.
मातीचे आणि कौलारू असलेले घर पाच वर्षांपूर्वीच पडले. त्याच घरात ती कशीबशी राहते. गेले वर्षभर घरात वीज नसल्याने घरासमोरील वीज खांबावरील विजेच्या प्रकाशात जेवण करते आणि घरासमोर एकटीच झोपते. आजूबाजूला जंगलसदृश परिस्थिती असताना ती वृद्धा धाडसाने राहत आहे. मागच्या पावसाळ्यात वीज मीटर जळाल्याने तो काढून ठेवला आहे. नवीन मीटर घ्यायचा, तर पैसे भरायची तेवढी आर्थिक ताकद नाही. त्यामुळे दरमहा येणारे वीजबिल भरते. याही वयात काम करून मी दिवस काढत असल्याचे ती सांगते. या पावसाळ्यापूर्वी घर बांधण्यासाठी मदत मिळावी, अशी तिची इच्छा आहे. तिला समाजातील दानशूरांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
शासन मदत देईल का?
घराच्या आजूबाजूला फारसी घरेही नाहीत. मग या पडक्या घरात पावसाळ्यात राहता कसे? यावर माहिती देताना ती म्हणाली की, पावसाळ्यात कशीतरी कागद टाकून राहते. कसेतरी दिवस काढते. जवळजवळ गेली १० वर्षे घर बांधणीसाठी मदत मिळावी म्हणून मी अक्षरश: वाट पाहत आहे. मात्र कोणीही दाद देत नाही. माझ्या अखेरच्या दिवसात तरी घर बांधायला शासन मदत देईल का? असा प्रश्न तिने उपस्थित केला.