सावंतवाडी : सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीचे पथक मंगळवारी आंबोलीत दाखल झाले. त्यांनी महादेवगड पॉर्इंट येथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच सांगली ते आंबोलीपर्यंतच्या सीसीटीव्हीची तपासणी केली. सीआयडीने आपल्यासोबत अरूण लाड या आरोपीला आणले होते. मात्र तो सीआयडीला घटना स्थळाबाबत विस्तृत माहिती देत नसल्याने सीआयडीसमोर पेच निर्माण झाला आहे.सांगली येथील अनिकेत कोथळे याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर कोथळे याला पोलिसांनी आंबोलीतील महादेवगड पॉर्इंट येथे आणून जाळले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर घटनेतील दोषी पोलिसांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. सीआयडी या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे.सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी हे मंगळवारी दुपारी सीआयडीच्या पथकासह आंबोलीत दाखल झाले. त्यांच्यासोबत हत्या प्रकरणातील अरूण लाड हा आरोपी होता. त्याने ज्या ठिकाणी अनिकेतला जाळण्यात आले ती जागा दाखविली तसेच लाकडे कोठून आणली, लाकडे आणण्यात कोण कोण सहभागी होते, त्याच्या अंगावर पेट्रोल कोठून आणून टाकले, याचीही माहिती सीआयडीला दिली. यावेळी सीआयडीने सांगलीहून येत असताना आंबोली दूरक्षेत्रावर कोण उभे नव्हते का, असे विचारले. मात्र यावेळी कारच्या पहिल्या सीटवर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे हा बसला होता, असे सांगितल्याचे बोलले जात आहे.दरम्यान सीआयडीच्या पथकाने आंबोली पोलीस दूरक्षेत्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे कशामुळे बंद होते, याचीही माहिती घेतली. तसेच आंबोली पब्लिक स्कूलच्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेºयात आंबोली-कोल्हापूर रस्ता दिसतो का, याची पाहणीही या पथकाने केली आहे. मात्र या कॅमेºयात अंधूक दिसत असून, ही कार पहाटेच्या सुमारास आंबोलीत आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सोबत आणलेला आरोपी अरूण लाड हा सीआयडीला विस्तृत अशी माहिती देत नसल्याने सीआयडीच्या तपासात पुढच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे आणखी एकदा सीआयडीचे पथक आंबोलीत येण्याची दाट आहे.आज-यातील पेट्रोलपंपावर कारमध्ये पेट्रोल भरलेसांगलीहून अनिकेत कोथळेचा मृतदेह आंबोलीत आणताना आजरा येथील पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सीआयडीने आजरा येथील पेट्रोल पंपावर जाऊन ही तपासणी केली. तसेच तेथील सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यात अनिकेतला घेऊन येणारी कार स्पष्ट दिसत असल्याने सीआयडी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे ठरविले आहे.सीआयडी अन्य आरोपींनाही आंबोलीत आणणारअनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील आरोपी अरूण लाड हा सीआयडीला तपासात सहकार्य करत नसल्याने सीआयडीने अन्य आरोपींनाही पुन्हा एकदा आंबोलीत आणून त्यांच्याकडून तपासाबाबत माहिती घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
अनिकेत कोथळे हत्या प्रकरण : सीआयडीचे पथक आंबोलीत, दोन ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले फुटेज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 11:12 PM