सावंतवाडी : विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव यांच्या आत्महत्येप्रकरणी सर्व माहिती संबंधित कुटुंबाने पोलिसांना द्यावी. जेणेकरून तपास करण्यास सोपे होईल. जी चिठ्ठी आहे ती वेळीच पोलिसांकडे दिल्यास खरे गुन्हेगार बाहेर येतील. यादव कुटुंबाने घाबरून जाऊ नये. त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत आम्ही करू, असे आश्वासन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिले.
दरम्यान, या घटनेनंतर यादव कुटुंबीयांना भेटायला गेलो तेव्हा एका व्यक्तीकडून आपले शूटिंग करण्यात आले. ही व्यक्ती संशयिताचा माणूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप खुद्द केसरकर यांनी यावेळी केला.ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अशोक दळवी, नारायण राणे, सचिन वालावलकर, मायकल डिसोजा, अमेय तेंडुलकर, अशोक दळवी आदी उपस्थित होते.माजी मंत्री केसरकर म्हणाले, मी यादव कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी एक संशयास्पद अज्ञात व्यक्ती माझे शूटिंग करीत असल्याचे दिसून आले. यावेळी आपण त्या व्यक्तीला विचारणा केली असता आपण त्याच कुटुंबातील असल्याचे त्याने सांगितले. परंतु माहिती घेतली असता या प्रकरणात संशयित म्हणून नाव असलेल्या कुटुंबीयांचा तो नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आपण ते शूटिंग त्याला डिलिट करण्यास सांगितली. मात्र, हा सर्व प्रकार चुकीचा आहे.मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्याचे कोणी शूटिंग करीत नाही. त्यामुळे यामागे काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता असून, पोलिसांनी याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा असे मला वाटते. परंतु तपासाच्या खोलात जाण्यासाठी कुटुंबीयांनी आपल्याकडे असलेली चिठ्ठी पोलिसांना द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हे प्रकरण गंभीर आहे. सावंतवाडीसारख्या ठिकाणी असे घडू नये. पण यातून सर्वांनी शिकण्यासारखे आहे, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.संघटना वाढीसाठी काम करणारयावेळी मंत्रिपद न मिळाल्याने कोणतीही नाराजी नाही. मंत्रिपद देण्याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. हा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. या निर्णयामुळे आता मला जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी वेळ मिळणार आहे. त्यामुळे जनतेशी संपर्क साधण्याबरोबरच व्यवसायातही लक्ष घालणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले....तर टाटा कंपनीकडून मोठी रक्कम घ्यावीबॅ. नाथ पै सभागृहासाठी मी एक कोटी साठ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे त्यासाठी टाटांकडून पैसे मागण्याचा विषयच नाही. त्यांना पैसे मागायचे असतील तर टाटांसारख्या उद्योजकांकडून मोठी रक्कम मागावी, असाही टोला यावेळी त्यांनी आमदार नीतेश राणे यांना लगावला.