तिलारी डाव्या कालव्याला आणखी एक भगदाड

By admin | Published: December 28, 2015 11:41 PM2015-12-28T23:41:29+5:302015-12-29T00:51:02+5:30

साडेसाती संपेना : गोव्याला पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाची कसरत

Another breakthrough in the tilari left canal | तिलारी डाव्या कालव्याला आणखी एक भगदाड

तिलारी डाव्या कालव्याला आणखी एक भगदाड

Next

साटेली भेडशी : तिलारीच्या डाव्या कालव्याला लागलेली साडेसाती संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी पडलेले भगदाड सोमवारी बुजविले असतानाच या ठिकाणाहून शंभर मीटरवर आणखी एक भगदाड पडले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर उद्यापर्यंत पाणी सोडणार, असे कालवा विभागाने सांगितले असतानाच आणखी एक भगदाड पडल्यामुळे आज, मंगळवारपासून पाणी सोडले जाण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, दुपारी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे, उपकार्यकारी अधिकारी अभियंता वायचळ, सोहनी यांनी जागेची पाहणी केली.
झरेबांबर-काजुळवाडी येथे मागील दोन-तीन दिवसांपासून कालव्यातील पाणी झिरपत असल्याचे तेथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. रविवारी सकाळी कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपू लागल्याने कालवा विभागाने तत्काळ पाणीपुरवठा बंद करीत सोमवारी भगदाड पडलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले. गळती समजण्यास एक दिवस जरी उशीर झाला असता, तर कालव्यासह अनेक लोकांच्या शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असते. मात्र, हे वेळीच लक्षात आल्याने भगदाड सिमेंट काँक्रिटने बुजविण्यात आले.
तिलारी प्रकल्पाच्या संपूर्ण कालव्याची अवस्था दयनीय असून, भरावाच्या ठिकाणी हा कालवा अनेक ठिकाणी खचलेला आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन कालवा विभागाने कमजोर ठिकाणांची पाहणी करून सिमेंट काँक्रिटने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. तिलारी येथील शासकीय ठेकेदार राजेंद्र म्हापसेकर यांनी कालव्याला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम तत्काळ हाती घेतल्याने अल्पावधीतच काम पूर्ण केल्याने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
प्रशासनाची तारांबळ
कालव्यातून पाणी सोडण्यास आणखी किती दिवस लागतील, असा प्रश्न कार्यकारी अभियंता साळे यांना विचारला असता, एका ठिकाणी पडलेल्या भगदाडाचे काम पूर्ण झाले असून, यानंतर सायंकाळपर्यंत दुसऱ्या ठिकाणच्या भगदाडाचे काम पूर्ण करून उद्या सकाळपर्यंत पाणी पूर्ववत सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कालव्याला पडलेल्या भगदाडाने गोवा राज्यात जाणारे पाणी थांबविल्याने प्रशासनावर दबाव वाढला असून, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Web Title: Another breakthrough in the tilari left canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.