सावंतवाडी : उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र भरारी पथकाला दारू तस्करीतील मोस्ट वॉँटेड बापू उर्फ प्रशांत भोसले हा हवा असून, त्याच्या शोधासाठी भोसलेच्या जवळच्या माणसांची उत्पादन शुल्क विभागाने धडपकड सुरू केली आहे. यातून विनायक ठाकूर याला ताब्यात घेण्यात आले आहे. ठाकूरचा ताबा सध्या तळेगाव दाभाडे येथील उत्पादन शुल्क विभागाकडे असला तरी सावंतवाडीतील आणखी एका दारू तस्काराचा शोध उत्पादन शुल्क विभाग घेत आहे. मात्र, तो अद्याप त्यांच्या हाताला लागला नाही.उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र भरारी पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी अवैध दारूचा साठा पकडला होता. या प्रकरणाची लिंक सिंधुदुर्गपर्यंत आली होती. पण अद्यापही कारवाई झाली नव्हती. मात्र आठवड्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रकरणाला गती आली आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने अवैध दारू धंद्यातील म्होरक्यावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. बापू भोसले याच्यावर सोलापूर तसेच पुणे परिसरात अनेक गुन्हे दाखल असल्याने उत्पादन शुल्क विभागाला तो हवा असल्याने त्याच्यासाठी उत्पादन शुल्क जंग जंग पछाडत आहे.सिंधुदुर्गमधून विनायक ठाकूर याला ताब्यात घेतल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर बापू भोसलेचा सावंतवाडीतील आणखी एक खास माणूस असून, त्याचा शोध हे पथक घेत आहे. पण अद्याप या पथकाला ती व्यक्ती सापडली नाही. बापू भोसलेवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने ठाकूरसह अन्य आरोपी त्याचे साथीदार असल्याने उत्पादन शुल्क विभाग सर्वच गुन्ह्यात ताब्यात घेणार आहे.
यातून अवैध दारूधंद्याची पाळेमुळे बाहेर येतील असा अंदाज आहे. सिंधुदुर्गचे दारूचे सोलापूर कनेक्शन यामुळे उघडकीला येण्यास मदत होणार आहे. उत्पादन शुल्कचे अधिकारी संताजी लाड यांंनी दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा अवैध दारूचा असला तरी आम्हांला यामागचा सूत्रधार बापू भोसले हवा असून, त्याचा आम्ही शोध घेत आहोत यापूर्वी आम्ही काहींना अटक केली आहे. तसेच आणखी काहीजण आरोपी असून, त्यांचाही शोध घेत असल्याचे लाड यांनी सांगितले.