सावंतवाडी : खंडणीचा आरोप करणाऱ्या डंपर चालक-मालक संघटनेने दोन दिवसांत जाहीर माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला. तसेच राणे यांनीही शहानिशा करून टीका करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी तालुकाप्रमुख उमेश कोरगावकर, ग्राहक सेल कक्षाचे तालुकाप्रमुख सुनील गावडे, मळगाव उपविभागप्रमुख महेश शिरोडकर, नेमळे शाखाप्रमुख महेंद्र परब आदी उपस्थित होते.
सावंतवाडी येथे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार राणे यांनी सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत केलेल्या तसेच डंपर चालक-मालक संघटनेने केलेल्या खंडणीच्या आरोपाचे खंडन केले.ते म्हणाले, मळगाव येथे कळणे मायनिंग डंपर वाहतुकीविरोधात आंदोलन सुरू होते. यात तहसीलदार कार्यालयात तहसीलदार व पोलीस ठेकेदारांची बैठक झाली होती. मायनिंग डंपर वाहतुकीचा अनेकांना त्रास होतो. या संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेतली होती.
या डंपर वाहतुकीमुळे ग्रामस्थांना धुळीचा तसेच श्वसनाचा त्रास होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करूनही प्रशासनाने व कंपनीकडून कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे रस्त्यावर उतरावे लागले.
- मी खंडणी घेणारा कार्यकर्ता नाही
रुपेश राऊळ म्हणाले, मी खंडणी घेणारा कार्यकर्ता नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्या मतदारसंघातील ज्वलंत विषयाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी आंदोलन सुरूच ठेवणार आहे. माझ्यावर खंडणीचा आरोप करणाºया डंपर चालक-मालक संघटनेने जाहीर माफी मागावी. अन्यथा दोन दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू. माझ्यावर राजकीय गुन्हे आहेत. मात्र, राणे यांच्या आजूबाजूला बसणाºयांवर कसले गुन्हे आहेत ते पहावे, असा सल्लाही त्यांनी राणे यांना दिला.