मालवण , दि. २७ : तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रन्चायझी म्हणून काम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या अनुषंगाने वीजपुरवठ्या संदभार्तील विविध कामे करण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती ही त्याच गावातील विद्युततंत्रीचे शिक्षण घेतलेल्या युवकांची केली जाणार आहे. त्यांना प्रत्येक महिन्यास सुमारे तीन हजार रुपयांचे मानधनही मिळणार आहे.
ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत कार्यरत असलेला विद्युत कर्मचारी हा काही गावांच्या समुहांसाठी नियुक्त करण्यात आला आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार संबंधित विद्युत कर्मचाऱ्याला त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या गावांमध्ये असलेले वीज वितरणाचे जाळे उपलब्ध आहे त्यामध्ये काही बिघाड झाल्यास किंवा दुरुस्ती करायची झाल्यास तातडीने सुविधा उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे या सेवा ग्रामपंचायतीमार्फत तातडीने उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने तसेच गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावात उद्भवणाऱ्या वीज पुरवठाविषयक समस्यांचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येण काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रॅन्चायझी म्हणून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
तीन हजार लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत ही फ्रॅन्चायझी म्हणून काम करताना त्याचे कार्यक्षेत्र हे ग्रामपंचायतीतंर्गत महसूली गावाचे संपूर्ण क्षेत्र राहणार आहे. यात निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी ग्राहकांचा समावेश असणार आहे.
महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणाऱ्या कामांपैकी मीटर रीडिंग घेणे, वीज देयके वाटणे, ब्रेकडाऊन अटेंड करून वीजपुरवठा पूर्ववत करणे, डी. ओ. फ्यूज टाकणे, फ्यूज कॉलच्या तक्रारी घेणे, रस्त्यावरील दिवाबत्ती देखभाल व बंद पडलेले दिवे बदलणे, नवीन जोडणीची कामे करणे, थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणे ही कामे ग्रामपंचायतीने फ्रॅन्चायझी म्हणून करायची आहेत.
या कामांसाठी ग्रामपंचायतीमार्फत उपयुक्त व क्षमता धारण करणाऱ्या व्यक्तींची एजन्सी म्हणून नेमणूक करून त्यांच्यामार्फत ही कामे करून घ्यायची आहेत. नेमणूक केलेल्या व्यक्तीला ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून ओळखले जाणार असून संबंधित व्यक्ती ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्युत तंत्री किंवा इलेक्ट्रिकल याचे शिक्षण घेतलेली, मराठी भाषेचे ज्ञान तसेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून संबंधित गावातील व्यक्तीचीच निवड केली जाणार आहे. एखाद्या ग्रामपंचायत क्षेत्रात इच्छुक व अर्हताधारण करणारी व्यक्ती न मिळाल्यास पाच किलोमीटर परिसरातील अन्य ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीची निवड केली जाणार आहे.
या ग्राम विद्युत व्यवस्थापकावर महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांचे तांत्रिक नियंत्रण तर प्रशासकीय नियंत्रण हे ग्रामपंचायतीचे असणार आहे. वीज पुरवठ्यासंदर्भातील कामांसाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकाला प्रती ग्राहक ९ रुपये प्रमाणे मिळणारे उत्पन्न किंवा ३ हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती महावितरण कंपनीमार्फत दिली जाणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.
किमान दहा हजार रुपये वेतन मिळावेशासनाच्या या निर्णयावर आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. गावातील बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र सद्य:स्थितीचा विचार करता तीन हजार रुपये मानधन हे फारच अत्यल्प आहे. त्यामुळे याचा विचार करून शासनाने किमान दहा हजार रुपयांचे मानधन दिल्यास त्याचा बेरोजगार तरुणांना लाभ मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावेत असा ठराव पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर यांनी मांडला.