सुधीर राणेकणकवली : रसिकांनी कलाकाराच्या निकषाने गाणे ऐकले तर ते अधिक परिणामकारक होऊ शकेल . कला पचविण्यासाठी आणि ती अंगी मुरण्यासाठी गुरु सहवास आवश्यक असतो . तो लाभला तर कलाकाराची कला सर्वांगदृष्ट्या बहरते. असे मत पुणे येथील पं.विजय कोपरकर यांचे शिष्य शास्त्रीय गायक मंदार गाडगीळ यांनी व्यक्त केले.आशिये श्री दत्त क्षेत्र येथे गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने २६व्या गंधर्व शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी संजय कात्रे यांनी मंदार गाडगीळ यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.संजय कात्रे यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंदार गाडगीळ यांनी दिलखुलास उत्तरे देत आपला सांगितिक प्रवास उलगडला.संगीताचे प्राथमिक शिक्षण ते संगीत अलंकार हा सुरेल प्रवास,गुरु सानिध्य,गुरु विचार,त्यांच्या मैफिली,रियाज याबाबत त्यानी मनमोकळा संवाद साधला.
गंधर्व मासिक सभेचा दर्जा, सातत्य, आयोजनामागची गंभीर भूमिका, काटेकोरपणे वेळ पाळणारे रसिक आणि आवर्जून उपस्थित असलेले कणकवलीतील संगीत तज्ज्ञ आणि विद्यार्थी यांचा विशेष उल्लेख यावेळी त्यांनी केला. आपल्या वैचारिक आणि व्यक्तिमत्व जडणघडणीत गुरूंचा मोठा वाटा आहे असे विनयाने सांगीतले.२६ वी गंधर्व शास्त्रीय संगीत सभा रसिकांना विशेष भावली. मंदार गाडगीळ यानी एकाहून एक सरस अशी गीते सादर करून मैफिल रंगवली.त्यांनी दमदार व सुरेल गायनाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
मैफिलिची सुरुवात किरवाणी रागातील "विलंबित एकताल..भज रे मन राम गोपाल" व "द्रुत एकताल ..मुकुट वारो सावरो रे "या सुरेल बंदिशिनी केली.त्यानंतर विलंबित रूपक मध्ये "राग दुर्गा" सादर केला.सुगम प्रकारात त्यानी "प्रथम तुला वंदितो "(अष्ट विनायक ),अबीर गुलाल उधळीत रंग (संत चोखा मेळा),कानडा राजा पंढरीचा (झाला महार पंढरी नाथ),सुरत पियाकी छिन बिसु राये "(सं.कट्यार काळजात घुसली)आदि रचना अभ्यासपूर्ण रितीने सादर केल्या.त्याना हार्मोनीयम साथ वरद सोहनी व तबला साथ प्रथमेश शहाणे, रत्नागिरी यानी उत्तमरित्या केली.ही संगीत सभा गंधर्व फाऊंडेशनच्या वार्षिक सभासदांच्या मदतीने आयोजित करण्यात आली होती. श्याम सावंत यानी प्रास्ताविक तर ध्वनी संयोजन सुरजित धवन व दळवी यानी केले . दामोदर खानोलकर यांच्या हस्ते कलाकारांचे स्वागत करण्यात आले.
गंधर्व सभा आयोजानाबद्दल कलाकारानी गौरवोद्गार काढले. सभा आयोजनासाठी गंधर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर, मनोज मेस्त्री,दामोदर खानोलकर,किशोर सोगम,संतोष सुतार,सागर महाडिक, विजय घाटे,विलास खानोलकर, राजू करंबेळकर व दत्तमंदिर कमिटीने विशेष मेहनत घेतली.२४ मार्च रोजी पुढील गंधर्व सभा !२७ वी गंधर्व शास्त्रीय संगीत सभा २४ मार्च रोजी कपिल जाधव व सहकारी (सोलापूर) हे 'सुंदरी 'वादनाने सजवणार आहेत. 'सुंदरी 'वादन हे अत्यंत दुर्मिळ आणि सुरेल वाद्य आहे.त्याचा आस्वाद घेण्यासाठी संगीत रसिकानी उपस्थित रहावे असे आवाहन गंधर्व फाऊंडेशनने केले आहे.