पाच वर्षांपूर्वी हरवलेल्या आसामच्या मनोरुग्णाची आईशी पुनर्भेट, संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे साहाय्य
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 17, 2024 02:57 PM2024-04-17T14:57:26+5:302024-04-17T15:00:47+5:30
संतोष पाटणकर खारेपाटण : पाच वर्षांपूर्वी मानसिक स्थिती बिघडलेली असताना, आसाम या राज्यातील दातुरी या छोट्याशा खेड्यातील सनुराम दास ...
संतोष पाटणकर
खारेपाटण : पाच वर्षांपूर्वी मानसिक स्थिती बिघडलेली असताना, आसाम या राज्यातील दातुरी या छोट्याशा खेड्यातील सनुराम दास हा घरातून बाहेर पडला आणि तो थेट पोहोचला हजारो किलोमीटर दूर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातून या अनोळखी युवकाला आजारातून बरे झाल्यानंतर पुनर्वसनासाठी ६ सप्टेंबर २०२१ रोजी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल करण्यात आले.
संविता आश्रमातील सेवा कार्यकर्त्यांच्या उपचाराने व मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. धुरी यांच्या मानसोपचाराने सनुराम हळूहळू बरा झाला. त्याने मार्च २०२४ मध्ये जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांना त्याच्या आसाममधील गावाची माहिती दिली. त्यांनी गुगलद्वारे सनुरामच्या मु. दातुरी, ता. बिजनी जि. चिरांग या गावाचा शोध घेऊन संपर्क केला.
माणुसकीच्या दृष्टीने सनुरामच्या आईला त्यांच्या हरवलेल्या मुलाचा शोध लागल्याची आनंदाची बातमी दिली. इतकेच नाही, तर या गरीब मजूर महिलेच्या मुलाला घरी परतण्यासाठी, त्याला त्याच्या आईच्या ताब्यासाठी आवश्यक सारी व्यवस्था केली. संविता आश्रमातील सोशल वर्कर माधव पाटील यांनी सनुरामला रेल्वेने आसामला त्याचे गाव दातुरी येथे नेऊन आई व लेकराची पुनर्भेट घडवून आणली. एकुलता एक सनुराम मनोरुग्णावस्थेत घरातून निघून गेल्याच्या घटनेनंतर आई जयंती दासचे सारे जीवनच दुःखाने भरून गेले होते. त्या त्यांचे राहते घर सोडून मुलीच्या घरी राहत होत्या.
जयंती आणि सनुराम या मायलेकरांची तब्बल पाच वर्षांनी जेव्हा पुनर्भेट झाली, तेव्हा या भेटीचे साक्षीदार असलेल्या समस्त दातुरी ग्रामस्थांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू ओघळले. सनुरामची आई जयंती दास यांनी आभार मानले