आचरा : रविवार पासून पुन्हा जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे आचरा पारवाडी,कालावल खाडींना पुर आल्याने खाडीकिना-या लगतच्या भागात पुरस्थीती निर्माण झाली आहे. भातशेती पाण्याखाली जाण्याबरोबरच या भागातील ग्रामस्थांच्या अंगणात पाणी आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास गंभीर स्थीती निर्माण होण्याची शक्यता या भागातील ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.रविवारी पुन्हा जोर धरलेल्या पावसाने आचरा पारवाडी,कालावल खाडींना पूर आला होता. पारवाडी येथील मोहन शिर्के, साळकर, गुरुनाथ आपकर,अरुण आपकर यांच्या तर चिंदर लब्देवाडी येथील प्रविण लब्दे दिनेश लब्दे यांच्या अंगणात पाणी आले आहे. यामुळे रात्रभर याभागातील ग्रामस्थांनी भितीच्या छायेखाली जागून काढल्या आहेत.
पाण्याचा निचरा होत नसल्याने पारवाडी,डोंगरेवाडी, हिर्लेवाडी, चिंदर भगवंत गड, लब्देवाडी, तेरई ,वायंगणी कालावल याभागातील भात शेती गेले आठ दिवस पाण्या खालीच असल्याने भातशेती कुजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत शासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.