बांदा, दोडामार्गला वळवाचा दणका
By admin | Published: May 17, 2015 01:37 AM2015-05-17T01:37:48+5:302015-05-17T01:37:48+5:30
वीज कोसळुन एक ठार : मायलेकी बचावल्या; सावंतवाडीतही पाऊस; झाडे कोसळल्याने महामार्ग ठप्प
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गला वळीव पावसाने शनिवारी चांगलेच झोडपले असून, याचा सर्वाधिक फटका बांदा व दोडामार्गला बसला. बांदा पानवलमध्ये काजू बागायतीत काम करणाऱ्या कामगारावर वीज कोसळली. यात जानू वाघू वरक (वय ३५, रा. रांगणा-तुळसुली, ता. कुडाळ) हा कामगार जागीच ठार झाला, तर दोडामार्ग-झरेबांबर येथे तुकाराम गवस यांच्या घरावर विजेचा लोळ कोसळला. यात मायलेकी थोडक्यात बचावल्या. मात्र, घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सावंतवाडीलाही पावसाने दणका दिला आहे. महामार्गावर ओरोस येथे झाडे पडल्याने सुमारे तासभर महामार्ग ठप्प होता.
शनिवारी दुपारपासूनच काही ठिकाणी पावसाने सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्याने सर्वांच्याच मनात भीतीचे सावट निर्माण झाले. बांदा-पानवल येथील काजू बागायतदार राजाराम मावळणकर यांच्या काजू बागायतीत कामगार नेहमीप्रमाणे काजू गोळा करण्याचे काम करीत होते. मुसळधार पाऊस असल्याने कामगारांना शेतमांगरात परतणे शक्य झाले नाही. जानू वरक यांच्यासह कामगारांनी काजूच्या झाडांचा आसरा घेतला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जानू वरक यांच्या अंगावर अचानक विजेचा लोळ कोसळल्याने त्यांचा भाजून जागीच मृत्यू झाला. तेथील कामगारांनी त्यांना तातडीने सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. जानू वरक हे काजू बागायतदार राजाराम मावळणकर यांच्याकडे गेली १२ वर्षे काम करीत होते. त्यांच्या अपघाती निधनाने मावळणकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. जानू वरक यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेची बांदा पोलिसांत उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती.
सावंतवाडीसह कणकवलीत जोरदार पाऊस
शहरात वादळी पावसाने शनिवारी दुपारी अचानक हजेरी लावली. सलग अर्धा तास पावसाने सावंतवाडी शहराला झोडपून काढले. पावसामुळे कोणतीही हानी झाली नाही.
शनिवारी सकाळपासून पडलेल्या कडक उन्हामध्ये पावसाची कोणतीही शक्यता नसताना दुपारी अचानक पावसाने सावंतवाडी शहरात जोर धरला. यामध्ये परिसरातील कोलगाव, माजगाव, मळगाव, आदी भागाला पावसाने झोडपून काढले. दरम्यान, पावसामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. अचानक आलेल्या पावसामुळे मोटारसायकलस्वारांची तारांबळ उडाली. कणकवली तालुक्यातही दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. सुमारे तासभर पाऊस कोसळत होता. तालुक्यात नुकसानीचे वृत्त नाही. वैभववाडी परिसरात गडगडाटासह ढगाळ वातावरण राहिले. उंबर्डे परिसराला दिवसभरात दोनदा पावसाने झोडपले. लोरे, आचिर्णे, नाधवडे परिसरात विजांच्या गडगडाटासह दमदार पाऊस झाला. कुडाळ ते ओरोस परिसरात ठिकठिकाणी महामार्गावर झाडे-फांद्या कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. (वार्ताहर)ं