कामगाराचा खून करणा-या संशयिताच्या मुसक्या आवळण्यास बांदा पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 11:06 AM2021-06-09T11:06:23+5:302021-06-09T11:07:12+5:30
बांदा : बांदा-गडगेवाडी येथे परप्रांतीय कामगार विश्वजीत मंडल याच्या खून प्रकरणी मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या मुंबई येथे आवळण्यास बांदा पोलिसांना ...
बांदा : बांदा-गडगेवाडी येथे परप्रांतीय कामगार विश्वजीत मंडल याच्या खून प्रकरणी मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या मुंबई येथे आवळण्यास बांदा पोलिसांना यश आले आहे. खून केल्यानंतर उल्हासनगर-कल्याण येथे पळून गेलेल्या सुखदेव बारीक या संशयिताला मंगळवारी रात्री उशिरा बांदा पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून अटक केली.
मुख्य संशयित मुंबईत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल जाधव, हवालदार संजय हुंबे, विठोबा सावंत यांचे विशेष पथक तात्काळ संशयिताला ताब्यात घेण्यासाठी मुंबई येथे रवाना झाले होते. संशयिताच्या मोबाईल लोकेशन वरून त्याला अटक करण्यात आली आहे.
संशयित सेंट्रिग कामगार असून तो उल्हासनगर येथे एका पुलाच्या कामावर होता. खून केल्यानंतर त्याने त्याच रात्री शनिवारी उशिरा रेल्वेने मुंबईच्या दिशेने पलायन केले. बांदा पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर आज सकाळी बांदा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अवघ्या तीन दिवसातच पोलिसांनी आरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले. मुख्य सूत्रधार ताब्यात आल्याने हा खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा उलगडा होणार आहे.